भिंतींवर संदेश, शहरात मात्र अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 10:02 PM2020-02-08T22:02:40+5:302020-02-08T22:02:46+5:30

पाचोरा शहरातील स्थिती । सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था, घनकचरा व्यवस्थापनाची समस्या कायम

The message on the walls, however, is unclear in the city | भिंतींवर संदेश, शहरात मात्र अस्वच्छता

भिंतींवर संदेश, शहरात मात्र अस्वच्छता

googlenewsNext


पाचोरा : शहरात ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ नगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात राबवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र पालिकेतर्फे उभारण्यात आलेले शौचालये, प्रसाधनगृहे यांची दुरवस्था झाली आहे. नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याने स्वच्छ सर्वेक्षण २०२० चा पुरता बोजवारा झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
शहरातील सार्वजनिक शौचालये, प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित यंत्रणा व ठेकेदाराकडून नियमितपणे साफसफाई केली जात नाही. नागरिकांनी उघड्यावर शौचस न जाता सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा यासाठी पालिकेतर्फे दहा ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आली. मात्र यामध्ये नियमितपणे पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. साफसफाईच्या नावाखाली मात्र बिले काढली जात असून सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यासाठी नागरिकांकडून संबंधित ठेकेदार दोन रुपयांची आकारणी करतात. याबाबत सत्ताधारी नगरसेवकदेखील प्रचंड नाराज असून त्यांना नागरिकांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेचे नगरसेवक सतीश चेडे, राष्ट्रवादीचे अशोक मोरे यांनी संबंधित यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत योग्य खर्च करून शहर स्वच्छतेकडे त्वरित लक्ष द्यावे. शहरातील स्वच्छतागृहांची साफसफाई करावी, घनकचरा व्यवस्थापन नियमित करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
गटारीतील घाण पाणी रस्त्यावर येऊन ते सर्वत्र वाहते व काही ठिकाणी साचते. यासंदर्भात नगरपालिकेचे ठेकेदार व कर्मचारी यांच्याकडे अनेकदा तक्रार व मागणी केली. परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहरातील व भुयारी मागार्तील भिंतींवर चित्र रंगवून शासनाच्या लाखो रुपये अनुदानाची उधळपट्टी झाली आहे. स्वच्छतेबाबत संदेश देणारे डिजिटल बॅनर लावून स्वच्छ व सुंदर शहराचा अविर्भाव केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ज्या भिंती स्वच्छतेचा संदेश देत आहेत त्याच भिंतींच्या आड प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे.

Web Title: The message on the walls, however, is unclear in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.