विजेची चोरी रोखण्यासाठी घरातील ‘मीटर’ विद्युत खांब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:15 AM2021-02-14T04:15:35+5:302021-02-14T04:15:35+5:30
जळगाव : विजेची चोरी रोखण्यासाठी महावितरणतर्फे एरियल बंच केबल टाकण्यात येत असून, दुसरीकडे मीटरमध्येही फेरफार करून विजेची चोरी रोखण्यासाठी ...
जळगाव : विजेची चोरी रोखण्यासाठी महावितरणतर्फे एरियल बंच केबल टाकण्यात येत असून, दुसरीकडे मीटरमध्येही फेरफार करून विजेची चोरी रोखण्यासाठी महावितरणने घरातील मीटर गल्लीतीलच विद्युत खांब्यांवर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्युत खांब्यावर एका पेटीत प्रत्येक ग्राहकाचे मीटर बसविल्यामुळे, विजेच्या चोरीला आळा बसणार असून, जळगावात अशाप्रकारे खांब्यावर मीटर बसविण्याचा पहिलाच उपक्रम असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
महावितरणच्या पथकाने चार दिवसांपूर्वी एमआयडीसी परीसरातील रामनगर मध्ये अचानक धाड टाकून, नागरिकांच्या वीज मीटरची तपासणी केली होती. या तपासणीत नऊ जणांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले होते. तसेच दुसऱ्या दिवशींही केलेल्या तपासणीत ७ जणांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले होते. रामनगर परिसरात साधारणत: ५०० घरे असून, यातील बहुतांश ग्राहकांकडून अशा प्रकारे मीटरमध्ये चुंबकीय पद्धतीचा वापर करून, मीटरचा वेग कमी करून विजेची चोरी करत असल्याचे महावितरण प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यामुळे ज्या ग्राहकांचे दर महिन्याला युनिट १५० ते २०० फिरायचे, त्या ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्यामुळे त्यांना ४० ते ५० युनिटपर्यंत बिल यायचे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने रामनगर मधील सर्व ग्राहकांचे मीटर गल्लीतील विद्युत खांब्यांवर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्फो :
खान्देशात पहिलाच प्रयोग जळगावात
महावितरणतर्फे वीजचोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, यामध्ये घरातील वीज मीटर विद्युत खांब्यांवर बसविण्याचा उपक्रम खान्देशात प्रथमच जळगाव शहरात राबविण्यात येत आहे. विद्युत खांब्यांवर ३ फूट लांबीच्या पेटीत १२ मीटर बसवून, या पेटीची देखभालीची जबाबदारी संबंधित भागातील शाखा अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. पेटीतील प्रत्येक मीटरवर संबंधित ग्राहकाचा मीटर क्रमांक असून, त्या क्रमाकांच्या आधारे दर महिन्याला रीडिंग घेऊन, ग्राहकांना वीजबिल देण्यात येणार आहे. या पेटीला बाहेरून ‘लॉक’ करण्याची व्यवस्था असून, याची किल्ली त्या-त्या भागातील शाखा अभियंत्यांकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, ऊन, वारा व पावसापासून या पेटीला कुठलाही धोका नसून, मीटर सुरक्षित राहणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
सर्व खर्च महावितरणचा :
विद्युत खांबावर एका पेटीत हे मीटर बसविण्यात येत असून, एका पेटीसाठी महावितरणला साधारणत: पाच हजार रुपये खर्च येत आहे. विद्युत खांब्यांवर पेटी बसविण्यासाठी शहरातील एका खासगी मक्तेदाराला ठेका देण्यात आला आहे. ग्राहकांचे घरातील मीटर काढून, ते पेटीमध्ये बसविण्यापर्यंतचा सर्व खर्च महावितरणतर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, रामनगरमध्ये आतापर्यंत १०० ग्राहकांचे वीजमीटर खांब्यांवर बसविण्यात आले असून, उर्वरित ग्राहकांचे मीटरही लवकरच खांब्यांवर बसविण्यात येणार आहेत.
इन्फो :
विद्युत खांबांवर मीटर बसविण्याचे फायदे
- ग्राहकांना मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही.
- विद्युत पुरवठ्याची वायर थेट खांब्यावर असल्यामुळे विजेची चोरी करता येणार नाही.
- ज्या ग्राहकांकडे विजेची थकबाकी आहे, त्या ग्राहकांचा वीजपुरवठा थेट विद्युत खांब्यावरूनच खंडित करण्यात येणार.
-दर महिन्याला रीडिंग घेण्यासाठी नागरिकांच्या घरी जाण्याची गरज राहणार नसून, विद्युत खांब्यावर एकाच ठिकाणी सर्व ग्राहकांचे रीडिंग घेता येईल.
-मुख्य म्हणजे या सुविधेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा घरोघरी जाऊन रीडिंग घेण्याचा वेळही वाचणार आहे.
इन्फो :
रामनगरमध्ये अनेक ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून, विजेची चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीटरमध्ये फेरफार केल्यामुळे युनिट फिरण्याची गती कमी होऊन, ग्राहकांना कमी वीजबिल यायचे. त्यामुळे या चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी या परिसरात सर्वच घरातील वीजमीटर गल्लीतील विद्युत खांब्यांवर बसविण्यात येत आहेत. यामुळे ग्राहकांना आता मीटरमध्ये फेरफार करणे शक्य नाही.
सुरेश पाचंगे, सहायक अभियंता, रामनगर, महावितरण.