एमआयडीसीतील जागा स्मशानभूमीसाठी अधिग्रहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:17 AM2021-04-21T04:17:14+5:302021-04-21T04:17:14+5:30
जळगाव : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एमआयडीसीतील के सेक्टरमधील खुली जागा १५०० चौरस मीटर पुढील सहा ...
जळगाव : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एमआयडीसीतील के सेक्टरमधील खुली जागा १५०० चौरस मीटर पुढील सहा महिन्यांसाठी अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंगळवारी दिले आहेत.
कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील नेरी नाका येथील स्मशानभूमी मनपामार्फत आरक्षित करण्यात आली आहे. येथे सध्या २४ ओटे आणि गॅस दाहिनी सुरू आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपात स्मशानभूमी उभारण्यासाठी एमआयडीसीतील ही जागा अधिग्रहीत करण्यात आली आहे.
या ठिकाणी कोरोना बाधित किंवा संशयित रुग्णांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने येथे मनपा प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.
प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी ही जागा स्मशानभूमी म्हणून घोषित करण्यात यावी. तसेच तेथे इतर सुविधा द्याव्यात, पाणी, कुंपण, जैव कचरा व्यवस्थापन, आवश्यकतेनुसार ओटे तयार करणे, अग्निरोधक उपाययोजना, मृत व्यक्तीच्या नावाची नोंदणी करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड पुरवण्यासाठी संबधित पुरवठादार यांना पुरवठा करण्याचे निर्देश करण्यात यावे, या बाबींचे आदेश महापालिकेला जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.