मध्यमवर्गीयांची निराशा करणारा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 01:20 PM2019-07-06T13:20:03+5:302019-07-06T13:20:34+5:30

पेट्रोल, डिझेल दरवाढीने सर्वांनाच बसणार फटका

The middle class's disappointing budget | मध्यमवर्गीयांची निराशा करणारा अर्थसंकल्प

मध्यमवर्गीयांची निराशा करणारा अर्थसंकल्प

Next

जळगाव : पेट्रोल, डिझेलवर वाढविण्यात आलेल्या करामुळे महागाई वाढून सर्वांनाच फटका बसणार असल्याने मध्यमवर्गीयांसह सर्वांसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचा सूर उमटत आहे. सोबतच शेतीसह लघु उद्योगांसाठीही कोणतीच तरतूद न केल्याने या क्षेत्रातूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
भाजप सरकारने ५ रोजी आपला अर्थसंकल्प सादर केला. अर्थव्यवस्थेला गती देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे काही जण सांगत आहे. मात्र यात पेट्रोल-डिझेलवर एक टक्क्याने कर वाढविल्याने इंधनाचे भाव वाढून महागाई वाढेल. सोबतच बचत म्हणून गुंतवणूक केली जाणाऱ्या सोन्यातही करवाढ करण्यात आल्याने त्याचाही फटका बसणार आहे. या सोबतच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणतीही ठोस योजना नसून शेतीसाठीही काही तरतुदी नसल्याने शेतकऱ्यांच्याही तोंडाला पाने पुसल्याचा आरोप होत आहे. लघु उद्योगांसाठी व्याजदरात सवलत मिळण्याची अपेक्षा होती तीदेखील पूर्ण झालेली नाही. आयकरात सरसकट ५ लाखापर्यंत सूट मिळण्याची मागणी असताना त्यातही अपेक्षा भंग झाला व दर महिन्याला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाल्यास दोन टक्के वाढीव टीडीएस लावल्याने व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
अर्थसंकल्पात मोदी सरकारने पुन्हा एकदा जनतेसमोर आकड्यांचा भूलभूलैय्या निर्माण केला आहे. देशात बेरोजगारीची समस्या असताना स्टार्ट अप आणि स्टॅण्ड अपसाठी सरकारने प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. हे आश्वासन प्रत्यक्षात अंमलात आले पाहीजे. बँकींग क्षेत्रातून ४ लाख कोटींची वसुली झाल्याचा दावा केला गेला. मात्र प्रत्यक्षात आजही ग्रामीण आणि सरकारी बँकांची परिस्थिती मोठी चिंताजनक आहे. या बँकाना आर्थिक आधार देताना हात आखडता घेतल्याचे दिसून येते. ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या असल्यातरी या पूर्वी ज्या घोषणा झाल्या त्याचीच अद्यापपर्यंत अंमलबजावणी न झाल्याने ग्रामीण महिलांचे जीवनमान ‘जैसे थे’च आहे. कृषी, आरोग्य, उच्च शिक्षण यासाठी अत्यंत तोकड्या स्वरूपाची तरतूद करण्यात आली आहे. २०२२ पर्यंत बेघरांना घरे उपलब्ध करून देण्यासाठीचे जुनेच आश्वासन देण्यात आले आहे.
- डॉ. उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस

‘शेतकरी मुक्त भारत’कडे नेणारा अर्थसंकल्प आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही. शेतकरी सन्मान योजनेसाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे, ती शेती वाचवण्यासाठी कामाची नाही. शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहे.
- एस.बी.पाटील,सदस्य,शेतकरीसुकाणूसमिती

समाधानकारक अर्थसंकल्प असून यामुळे अर्थव्यवस्थेला गती येईल. जे धोरण, योजना जाहीर केल्या आहेत, त्या राबविल्या जाव्यात.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.

सर्वसामान्यांसाठी चांगल्या सुविधा असल्या तरी लघु उद्योगांसाठी नाराजी करणारा अर्थसंकल्प आहे. व्याज दरात सवलत मिळण्याबाबत अपेक्षाभंग झाला आहे.
- किरण राणे, उपाध्यक्ष, जळगाव इंडस्ट्रीज असोसिएशन.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दरात कोणतीही वाढ होणार नसल्याने दिलासा आहे. सोबतच सामान्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. जीएसटी दर कमी होण्याची अपेक्षा होती, ती झाली नाही.
- महेंद्र ललवाणी, विक्रेते, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू.

अनेक तरतुदी चांगल्या आहेत. मात्र सोन्यावर अबकारी कर वाढविण्यात आल्याने त्याचा सर्वांना फटका बसून सोन्यातील गुंतवणुकीस अडचणी येऊ शकतात. सोबतच कारागिरांना मंदीची झळ बसू शकते.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

मध्यमवर्गीयांसह व्यापाºयांचीही निराशा करणारा अर्थसंकल्प आहे. आयकराची उत्पन्न मर्यादा सरसकट ५ लाख करण्याची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. या सोबतच बँक खात्यांमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झाल्यास जो दोन टक्के वाढीस टीडीएस लावला आहे, तो विनाकारण भुर्दंड आहे.
- पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट महाराष्ट्र

लहान व्यापाºयांना अल्पावधीत कर्ज देण्याचा निर्णय स्वागतार्ह असण्यासह उद्योजक व्यापाºयांना निवृत्तीवेतन लागू करण्याचाही निर्णय दिलासा दायक आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.


गोमाता संवर्धन, गोवंश संवर्धन यासाठी कोणतीही तरतूद नसल्याने नाराजी आहे.
- अ‍ॅड. विजयकाबरा, गो सेवाव्रती.

पेट्रोल-डिझेल दरवाढीने महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांना अधिक भुर्दंड बसेल. - संतोष जैन, नागरिक.

सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करून बचत केली जाते. मात्र त्यातही कर वाढविले आहे. सोबतच इंधन दरवाढीने महागाई भडकून घराचे ‘बजेट’ कोलमडणार आहे.
- संगीता जाधव, गृहिणी

व्यापाºयांसाठी विविध योजनांची घोषणा केल्याने व्यापाºयांना दिलासा मिळाला आहे. जीएसटी दरात बदल अपेक्षित होता. तो झाला नाही.
- युसुफ मकरा, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ.


मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासह विविध उपाययोजनांमुळे कोट्यवधींचा कर वाढणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
- सागर पाटणी, उपाध्यक्ष, सीए असोसिएशन जळगाव शाखा.

Web Title: The middle class's disappointing budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव