जळगावात मध्यरात्रीनंतर इंधन दर ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:23 PM2018-10-05T12:23:21+5:302018-10-05T12:24:32+5:30
सकाळी सहा वाजेपासून नवीन दर लागू
जळगाव : गेल्या अनेक दिवसांनंतर इंधनाचे दर कमी करून सरकारने सर्वांनाच दिलासा दिला असला तरीजळगावात रात्री १२ वाजेनंतरही इंधनाचे दर ‘जैसे थे’च असल्याचे दिसून आले. नवीन दर ५ आॅक्टोबर रोजी सकाळी सहा वाजेपासून लागू झाल्याचे सांगण्यात आले.
कमी झालेले दर ५ आॅक्टोबरपासून अर्थात गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचे सरकारने जाहीर केले. या बाबत रात्री पाहणी केली असता रात्री १२ नंतरही गुरुवारी असलेलेच दर कायम असल्याचे दिसून आले. गुरुवारी पेट्रोल ९२.२६ रुपये प्रती लीटर होते तेच दर मध्यरात्रीनंतरही कायम होते. सकाळी सहा वाजेनंतर यात साधारण पाच रुपयांनी दर कमी होऊन ते ९७.२६ रुपयांवर येण्याची शक्यता आहे. गुरुवारी डिझेलचे दर ७९.७७ रुपये होते, त्यातही साधारण अडीच रुपयांनी दर कमी होऊन ते ७७.२७ रुपये होण्याची शक्यता आहे. यात थोड्याफार पैशाने कमी जास्त फरक असू शकतो, असेही विक्रेत्यांनी स्पष्ट केले.
इंधन दर बदलाबाबत त्याची अंमलबजावणी कधी करावी याबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाही.
- राहुल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी.
दररोज इंधन दर बदलाच्या प्रक्रियेत (सिस्टीम)मध्ये सकाळी सहा वाजताच दर बदलतात. त्यामुळे रात्री बारा वाजेपासून नवीन दर लागू होणे शक्य नाही.
- पालदेम बुटिया, वाणिज्य अधिकारी, इंधन कंपनी.
इंधन दर कमी करण्याची घोषणा झाली असली तरी हे दर सकाळी सहावाजेपासूनच लागू होतील. सर्वच सरकारी इंधन कंपन्यांचे दर सकाळीच बदलतात. रात्रीपासून दर बदल शक्य नाही.
- प्रकाश चौबे, अध्यक्ष, पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन