इमर्जन्सी लोडशेडिंग विरोधात शेतकऱ्यांचे मध्यरात्री रास्तारोको
By चुडामण.बोरसे | Published: September 1, 2023 12:21 PM2023-09-01T12:21:43+5:302023-09-01T12:54:58+5:30
सुमारे ४०० ते ५०० शेतकरी झाले होते एकत्र
पारोळा जि.जळगाव : इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाने सुरू केलेला विद्युत पुरवठा अवघ्या दहा मिनिटात बंद केल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. पारोळा तालुक्यातील सुमारे ४०० ते ५०० शेतकऱ्यांनी रात्री राष्ट्रीय महामार्गावर दगड ठेवून रास्ता रोको आंदोलन केले.
पाऊस नाही, पिके कोमेजली आणि त्यातही लोडशेडिंग आणि वीज सुरू केलीच तर आणखी इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाने अवघ्या काही मिनिटात वीजपुरवठा बंद होत असल्याने सावखेडा ता. पारोळा या फिडर अंतर्गत असलेल्या तुऱ्हाटखेडा , मऱ्हाटखेडा , कन्हेरे , सारवे , सांगवी , ईटवी ,विटनेर ,पळासखेडे खुर्द , पळासखेडे बुद्रुक दगडी सबगव्हाण, दहिगाव, मोहाडी , खेडीढोक ,राजवड आदी गावाचा वीजपुरवठा वारंवार खंडित करण्यात आला. सुमारे ४०० ते ५०० शेतकरी एकत्र होऊन फिडर वरील वीज कर्मचार्यांना जाब विचारत असताना कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे उत्तरे दिल्याने शेतकरी संतप्त झाले. रात्री बारा वाजेच्या सुमारास दगडे लावून सुरत- नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही पोलिसांना घटना कळवली. मध्यरात्री डीवायएसपी सुनील नंदवाळकर , पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार घटनास्थळी हजर झाले. आजूबाजूने मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. नंदवाळकर यांनी वीज अभियंता मोरे याना पारोळा येथून झोपेतून उठवून घटनास्थळी नेले. वाहनांचे नुकसान होऊ नये अथवा प्रवासी वेठीस धरले जाऊ नये म्हणून वाहतूक पारोळा येथून राजवड मार्गे धरणगाव , एरंडोल अशी वळवण्यात आली होती. अखेर मोरे यांनी शेतकऱ्यांना वेळेवर वीज देण्याचे आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पोलिसांच्या सहकार्याने जमाव शांत झाला.