अवैध रेती वाहतुकीवर मध्यरात्रीही नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 05:39 PM2019-12-14T17:39:58+5:302019-12-14T17:40:03+5:30
कारवाई : उटखेडा येथे पकडले एक ट्रॅक्टर
सावखेडा ता रावेर- येथून जवळच असलेल्या उटखेडाजवळ १३ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास अवैध रेती वाहतूकदारावर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. यात प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या भरारी पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर पाळत ठेवून रात्री अचानक उटखेडा येथे रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले.हे ट्रॅक्टर रावेर तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले. वारंवार होणाºया अशा कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. ही कारवाई यापुढेही सतत अशीच चालू राहणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान सध्या वाढत असलेल्या थंडीचा फायदा घेत अवैध रेती वाहतूक करणारे रात्रीचा फायदा घेत अवैध रेती वाहतूक करीत असतात. त्या अनुषंगाने महसूल विभागाच्या भरारी पथकाने थंडीचा विचार न करता रात्रीच पाळत ठेवून ट्रॅक्टर पकडले व पुढील कारवाईसाठी रावेर तहसील कार्यालयात ते ट्रॅक्टर जमा करण्यात आले.
सदर पथकात संदीप जैस्वाल (मंडळाधिकारी खिरोदा), अजय महाजन (तलाठी सावखेडा), समीर तडवी (तलाठी निंभोरा ), प्रवीण वानखेडे (तलाठी वाघोदा ), तेजस पाटील (तलाठी विवरा ) व कोतवाल (चिनावल) हे सहभागी होते.
(फोटो -योगेश सैतवाल, सावखेडा)