पांझरा काठावरील नागरिकांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:14 AM2019-08-06T00:14:43+5:302019-08-06T00:14:49+5:30
अमळनेर : अक्कलपाडा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पांझरा नदीत पुन्हा ३८ हजार ५०० क्यूसेस पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीची ...
अमळनेर : अक्कलपाडा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पांझरा नदीत पुन्हा ३८ हजार ५०० क्यूसेस पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीची पातळी ३ ते ४ मिटरने वाढणार आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील पांझरा काठावरील सर्व गावातील नागरिकांना स्थलांतरित होण्याचा इशारा दिल्यानंतर काही नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
४ आॅगस्ट रोजीच्या जोरदार पावसाने मुडी, बोदर्डे परिसरात ग्रामपंचायतीला पाण्याचा वेढा पडून रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे २०० आदिवासी कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले.
त्याचप्रमाणे ५ आॅगस्ट रोजी पुन्हा ३८ हजार ५०० क्यूसेस पाणी सोडले असल्याने पाण्याची पातळी ३ ते ४ मीटरने वाढणार आहे. परिणामी अधिक धोका निर्माण झाला आहे.
प्रांताधिकारी सीमा आहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस अधिकारी-कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी साहित्यासह मुडी, बोदर्डे मांडळ, कलंबू, बाम्हणे, भिलाली, तांदळी, शहापूर, भिलाली या गावांना ध्वनीक्षेपकाद्वारे गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षकांना गावातच थांबण्याचे आदेश
जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी यांना गावातच थांबून नागरिकांना मदत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन साहित्य व पट्टीचे पोहणारे सज्ज ठेवून नदीकाठावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जे शासकीय कर्मचारी गावात थांबणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार देवरे यांनी दिला.