एलसीबीचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; पती-पत्नीच्या वादात लाचखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 06:20 PM2021-10-13T18:20:07+5:302021-10-13T18:20:26+5:30
मिलिंद केदार हा स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीला असून महिला सहाय्य कक्षाचा त्याला प्रमुख बनविण्यात आले होते.
जळगाव : पती-पत्नीच्या वादात पतीकडून २० हजार रुपयांची लाच घेताना स्थानिक गुन्हे शाखेचा सहायक फौजदार मिलिंद सांडू केदार (वय ५४,रा.कृषी कॉलनी, नवसाचा गणपती मंदीराजवळ जळगांव) याला लाचलुपचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच रंगेहाथ पकडले. केदार याला अटक करण्यात आली असून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद केदार हा स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीला असून महिला सहाय्य कक्षाचा त्याला प्रमुख बनविण्यात आले होते. या कक्षात पती-पत्नी यांचे समुपदेशन करुन वाद मिटविले जातात. रायपुर, ता.जळगाव येथील ३० वर्षीय तरुण व त्याच्या कुटुंबियांविरुध्द पत्नीने महीला सहाय्य कक्षात तक्रारी अर्ज केलेला होता. या अर्जाच्या चौकशीअंती त्यांच्या पत्नीला कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे पत्र दिल्यानंतर तक्रारदार तरुणाला कायदेशीर व योग्य ती मदत करण्याचे कारण सांगून २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली. पाटील यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातच सापळा लावला.
कार्यालयाच खुर्चीवर बसून स्विकारली लाच
मिलिंद केदार याने महिला सहाय कक्षात खुर्चीवर बसूनच तडजोडीअंती ठरलेली २० हजार रुपयांची लाच स्विकारली. पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदिप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.