दूध आणि पाणी एकाच किमतीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:58 AM2018-06-25T00:58:03+5:302018-06-25T01:00:15+5:30
'पातळ' झाले दर : उत्पादकांची परवड, भावाच्या चढ-उताराने शेतकरी हैराण
जिजाबराव वाघ ।
चाळीसगाव (जि.जळगाव) : दुधाच्या खरेदी दरात सातत्याने चढउतार होत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, सद्य:स्थितीत बिसलरीचे एक लीटर 'पाणी' आणि 'दूध' यांची किंमत जवळपास सारखी झाली आहे. उत्पादन खर्च अधिक आणि 'पातळ' झालेले भाव यामुळे शेतकºयांच्या हाती जनावरांचे 'शेण'ही उरणार नाही, अशी परिस्थिती आहे. या दुधबाणीमुळे पशुपालकांमध्ये सरकारविषयी खदखद आहे.
चाळीसगावची ओळख संपूर्ण राज्यात 'दूधगंगा' म्हणून आहे. गेल्या काही वर्षात पशुपालन व्यवसाय आतबट्ट्याचा झाल्याने येथील दूधगंगेला आहोटी लागली. अनेक संकटांची रांग दूध उत्पादकांसमोर असल्याने भावातील तफावतही मारक ठरत आहे. जळगाव जिल्हा दूध संघाकडून मार्चपर्यंत गाईचे दूध २६ रुपये तर म्हशीचे दूध ४२ रुपये प्रति लीटरने खरेदी केले जात होते. मात्र दूध पावडरचे दर कोसळल्याने दुधाचे दर 'पातळ' म्हणजे प्रति लीटर तीन रुपये पंच्याहत्तर पशांनी खाली आले आहे. सद्य:स्थितीत दूध संघ गाईचे दूध २२ रुपये पंचवीस पैसे तर म्हशीचे दूध ४० रुपये प्रति लीटरने खरेदी करीत आहे.यामुळे दूध व्यवसायासमोर टिकून राहण्याचे मोठे आव्हान आहे. बिसलरी पाणी व दुधाचे एकच झालेले भाव पाहता या व्यवसायातील शेतकरी आणि पशुपालकांची परवड लक्षात यावी.
दूध पावडचे दर पडले
बाजारात दूध पावडरचे दर पडल्याने गाईच्या दुधाचे भाव खाली आले आहेत. राज्यभर दूध संघांनी कमी दर देण्याचा सपाटा लावला असून यामुळे दुधदुभत्याचा व्यवसाय शेतकºयांच्या हाताबाहेर गेला आहे.
जळगाव दूध संघ दरदिवशी सहा टन दूध पावडर तयार करते. मार्चच्या आधी हे उत्पादन १५ टन होते. दूध पावडचे भाव पडल्याने मागणीही कमी झाली आहे. गाईच्या दुधाची पावडर १२० रुपये प्रतिकिलो तर म्हशीच्या दुध पावडरचे दर १४० रुपये प्रति किलो आहेत. मार्चपर्यंत दूध संघाने तोटा सहन करीत गाईचे दूध २६ रुपये प्रतिलीटर खरेदी केले. मात्र दूध पावडर बाजारात तेजी न आल्याने संघाने तीन रुपये ७५ पैशांनी गाईच्या दुधाचे दर कमी केले आहेत.
'गोकुळ'कडून १८ रुपयांनी खरेदी
राज्यातील आघाडीचा दूध संघ असणाºया ‘गोकुळ’कडून कार्यक्षेत्राबाहेरील गाईचे दूध १८ रुपये प्रति लीटरने खरेदी केले जाते.
हाती 'शेण'ही नाही : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालन करतात. एकेकाळी चाळीसगावचा दूध व्यवसाय संपूर्ण राज्यात 'मॉडेल' ठरला होता. वीस वर्षापूर्वी लाखात व्यवहार व्हायचे. त्यावेळी चाळीसगावच्या दुधगंगेत कोटीमध्ये उलाढाल होत असे. कालौघात हे चित्र पालटले असून दुधगंगाही आटली आहे. सद्यस्थितीत तर महागलेले पशुखाद्य, वाळलेले वैरण व पशुवैद्यकीय सेवेने गाय दूध उत्पादक कमालीचा संकटात सापडला आहे. खर्च आणि उत्पादन यांचा मेळ घालतांना शेतकºयांच्या पदरात पडणारे 'शेण' देखील मिळणार नाही, अशी बिकट परिस्थिती आहे.