गिरणा पात्र वाहतुकीसाठी कोरले जातेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 08:39 PM2020-01-10T20:39:35+5:302020-01-10T20:41:29+5:30
एरंडोल व पाचोरा तालुक्याच्या सीमेवर गिरणा काठावर माहिजी या गावी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रेती कोरुन रस्ता खोल करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या वाहनांसह बैलगाडीचालकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाहतूक बंद पडली आहे.
प्रमोद पाटील
कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : एरंडोल व पाचोरा तालुक्याच्या सीमेवर गिरणा काठावर माहिजी या गावी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रेती कोरुन रस्ता खोल करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या वाहनांसह बैलगाडीचालकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाहतूक बंद पडली आहे. यामुळे यात्रेकरूंंत नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पाचोरा तालुक्यातील माहिजी येथे पोष पोर्णिमेपासून यात्रोत्सव सुरू झाला आहे. ग्रामीण भागात मेला, यात्रा, उरुस या परंपरागत उत्सवांना आजच्या डिजिटल युगातदेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. माहिजी यात्रा तर पर्वणीच म्हणावी. गुलाबी हुडहुडी, नदीचे भलेमोठे पात्र, त्यात यंदा भरभरून वाहणारे थंडगार पाणी यात्रेकरुंना जणू भेटीला येण्यासाठी खुणावत आहे. पायी, सायकल, बैलगाडी, मोटारसायकल यांची मोठी वर्दळ सध्या या रस्त्यावर दिसत आहे. माहिजीची ही यात्रा एरंडोल, पारोळा, भडगाव तालुक्यांतील माहेरवासीणींसाठी भेटीगाठीची मोठी पर्वणीच. त्यामुळे या चार-पाच तालुक्यातील अनेक गावांना या यात्रेचे आकर्षक आहे. परंतु एरंडोल व पारोळा तालुक्यांतील यात्रेकरुंंना गिरणा नदी ओलांडून पैलतीरावरील माहिजीच्या यात्रेला जावे लागते. माहिजी तिकडच्या काठावर तर हनुमंतखेडे या काठावरमध्ये गिरणामाई वाहते. तिच्यावर पूल नसल्याने यात्रेकरुंना नदीपात्रातूनच ये जा करावी लागते.
यंदा मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने तेथे असलेल्या होडीतूनच पलीकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. बैलगाडीतूनदेखील जाता येते. पण होडी मालकांनी नदी पात्र यंदा जेसीबी मशिनने कोरुन जास्त खोल करुन टाकल्याने आता बैलगाडीदेखील खोल पाण्यात जाऊ शकत नसल्याचा आरोप यात्रेकरुंनी केला आहे. माहिजी व हनुमंतखेडेचे तलाठी किंवा दोन्ही तालुक्यातील प्रशासनाने किमान यात्रेसाठी तरी याठिकाणी तात्पुरती रहदारीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
माहिजी, खेडगाव, नांद्रा, लासगाव, सामनेर, दहिगाव, वरसाडे, डोकलखेडे, मोहाडी, हडसन, कुरंगी, बाम्हणे, निपाणे,पिंप्री, ताडे, जवखेडे, अंतुर्ली, तळई, कासोदा, आडगाव, मालखेडा, फरकांडे, मंगरूळ यासह पारोळा येथून येणाऱ्या नागरिकांना माहिजी येथील या नदीपात्रातूनच दळणवळणाचा हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. येथे कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा, अशी खूप जुनी मागणी यापरिसरातील नागरिकांकडून नेहमी होत असते. पण अतिशय महत्वाचा हा मार्ग कायम दुर्लक्षित राहिला आहे. लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
आमच्या गेल्या दोन पिढ्यांपासून या नदीपात्रात होडी चालवायचा व्यवसाय आहे. दीड लाखाची एक अशा दोन होड्या आहेत. नदीपात्रात किंवा पुरात काही प्रेत वगैरे वाहून आल्यास किंवा कुठलीही अडचण प्रशासनाला आल्यावर आमच्या होड्याच कामाला येतात. आम्ही सहकार्य करतो. होडी काठावर लावायला खोल जागा लागते म्हणून फक्त दोनच ठिकाणी काठावर कोरले आहे.
-विष्णू तूकाराम कोळी, होडीमालक, हनुमंतखेडे, ता.एरंडोल