लाखोची बनावट दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 12:34 AM2017-02-16T00:34:55+5:302017-02-16T00:34:55+5:30
उत्पादन शुल्कची कारवाई : 15 कि.मी.र्पयत केला पाठलाग
जळगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर 1 लाख रुपये किमतीची बनावट दारु व अडीच लाख रुपये किमतीची कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी इदगाव शिवारात पकडली. या कारचा पथकाने तब्बल पंधरा किलोमीटर्पयत पाठलाग केला. शिरपूर येथून वाशिम येथे ही दारु नेण्यात येत होती.
अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत बनावट दारुचा मोठय़ा प्रमाणात वापर झाला, त्यामुळे मंगळवारी तेथे चार जणांचा बळी गेला. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर विभागीय उपायुक्त पी.पी.सुर्वे यांनी विभागातील सर्व अधीक्षकांना बनावट दारुविरुध्द मोहीम राबविण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनीही जळगावचे अधीक्षक एस.एल.आढाव यांना बनावट दारुवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. आढाव व विभागीय निरीक्षक सी.पी.निकम यांना शिरपूर येथे निर्मित झालेली बनावट दारु निवडणुकीसाठी जळगावमार्गे विदर्भात जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार निकम यांनी सहायक दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, भूषण वाणी, संतोष निकम व मुकेश पाटील या सहका:यांना सोबत घेवून चोपडय़ाजवळ सापळा लावला होता.
विदेशी दारुच्या 624 बाटल्या
या कारची तपासणी केली असता त्यात विदेशी दारुच्या 180 मिली.च्या 624 बाटल्या आढळून आल्या. त्याची किंमत 78 हजार रुपये आहे. कारचालक आशिष मिलनकुमार चौकसे (वय 24 रा.कारंजा लाड, ता.जि.वाशिम) याला कारसह (क्र.एम.एच.09 ए.एल.6688) ताब्यात घेण्यात आले.
कार चालकाने बदलविला मार्ग
कारवाईच्या भीतीने कार चालकाने कार धरणगावमार्गे न नेता धानोरामार्गे वळविली. मार्ग बदल केल्याचे समजताच पथकाने कारचा पाठलाग केला. पुढे त्याला पथकाची कुणकुण लागली. त्यामुळे त्याने भरधाव वेगाने कार पळवली. त्याचा पाठलाग करत असताना सकाळी साडे आठ वाजता इदगाव शिवारात या कारच्या पुढे पथकाने त्यांचे वाहन आडवे लावले. यातील आरोपीला दुस:यांदा जळगावात बनावट दारुसह पकडण्यात आले.