सुवर्णनगरीतील सुवर्ण व्यवसायाला करोडोंचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:16 AM2021-03-14T04:16:38+5:302021-03-14T04:16:38+5:30
जळगाव : जनता कर्फ्यूमुळे जळगावातील सर्वच व्यवहार ठप्प झाले असून यामध्ये सुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या येथील सुवर्ण व्यवसायालाही झळ ...
जळगाव : जनता कर्फ्यूमुळे जळगावातील सर्वच व्यवहार ठप्प झाले असून यामध्ये सुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या येथील सुवर्ण व्यवसायालाही झळ बसली असून दोन दिवसात १०० ते १२५ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनचे लॉकडाऊन, त्यानंतर शिथिलता मिळाली तरी संसर्ग वाढत असल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी बंद ठेवलेला व्यवसाय, जुलै महिन्यातील सात दिवसांचे लॉकडाऊन या नंतर आता पुन्हा जनता कर्फ्यूमुळे व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने पुन्हा संकट ओढावले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. येथील सुवर्ण व्यवसाय मोठा असून दररोज करोडो रुपयांची उलाढाल होते. मात्र वाढत्या कोरोनाने या व्यवसायाला पुन्हा फटका बसला आहे. जळगावात सुमारे २२५ ते २५० सराफ व्यावसायिक आहेत. जळगावात दररोज ५० ते ६० कोटी रुपयांची उलाढाल होते. जनता कर्फ्युमुळे दोन दिवसात १०० ते १२५ कोटींची उलाढाल ठप्प झाली असून रविवारीदेखील जनता कर्फ्यू राहणार असल्याने हा आकडा आणखी वाढणार आहे.