दोन दुकानांमधून लाखोंचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:04 AM2019-02-16T11:04:28+5:302019-02-16T11:04:38+5:30
गजबजलेल्या वस्तीमधील दुकानांमध्ये चोरी
जळगाव : चोऱ्या घरफोड्यांचे सत्र सुरुच असून शहरातील नवीपेठेत इंडिया फर्निश व लक्ष्मी गोल्डन हाऊस ही दोन दुकान फोडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. यात इंडिया फर्निशमधून चोरट्यांनी सव्वालाखांची रोकड तर सोने कारागिराच्या दुकानातून ग्राहकांचे दागिण्यासह रोख रक्कम असा ३० हजाराचा ऐवज लांबविला आहे. गस्त घालणाºया गुराख्यामुळे मध्यरात्रीच प्रकार उघड झाला असून चोरटा इंडिया फर्निश या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
शहरातील नवीपेठेतील किशोर चैत्रराम तलरेजा (रा. गणपतीनगर, जळगाव) यांच्या मालकीचे नवीपेठेत इंडिया फर्निशिंगचे दुकान असून ते पडदा व सोप्याचे कापड विक्री करतात.
सकाळी ९ वाजता त्यांना शेजारील दुकानदाराने चोरी झाल्याची माहिती दिली. ते तत्काळ दुकानावर आले.
गुरख्याने दिली चोरीची माहिती
शहरातील नवीपेठेत लालचंद नारायण रुंगठा (रा. युनियन बँकशेजारी नवीपेठ, जळगाव) यांच्या मालकीचे दुकान नं.१४५ लक्ष्मी गोल्डन हाऊस आहे. या दुकानात त्यांचा मुलगा हेमंत रुंगठा कारागिर म्हणून काम करतो. रात्री ९ वाजता ते दुकान बंद करुन घरुन निघून गेले. पहाटे तीन वाजता गुरख्याने घरी येवून दुकान फोडल्याची माहिती दिली. त्यानुसार रुंगठा यांनी पहाणी केली असता दुकानातील लाकडी ड्राव्हरमधील डब्बीत सुमारे दहा ग्रॅम सोन्याचे तुकडे व ड्रॉवरमध्ये चार हजार रुपये असा ऐवज लांबविला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर रुंगठा यांनी शहर पोलिसांना प्रकार कळविला. शहर पोलीस ठाण्याचे विजयसिंग पाटील, प्रितम पाटील यांच्यासह कर्मचाºयाने मध्यरात्री घटनास्थळ गाठून माहिती घेतली.
पहाटे तीन वाजून अठरा मिनिटांनी चोरट्याने इंडिया फर्निशिंग या दुकानातील छोटे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. यानंतर तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी इतरत्र कुठेही न जात थेट दुकानाची रोकड असलेल्या ड्रॉवरजवळ पोहचला. तेथून सर्व रक्कम काढून टेबलावर ठेवली. यानंतर त्याने सर्व रक्कम खिशात टाकली. व निघून गेला.
चोरटा हा २० ते २५ वयोगटातील असून त्याने तोंडावर रुमाल व चष्मा घातला होता. तीन वाजून तीस मिनिटांनी त्याने ड्रॉवरमधील सर्व रक्कम बाहेर काढली. ही रक्कम घेऊन तो बॉम्बे सायकल मार्टच्या गल्लीतून जातांना सीसीटीव्ही कॅमेºयात दिसत आहे.
श्वान पथकाला केले पाचारण
पहाटे माहिती मिळताच श्वान पथक घटनास्थळी आले.श्वॉनाने टॉवर चौकापर्यंत मार्ग दाखविला. तसेच ठसे तज्ज्ञांनी इंडिया फर्निशिंगच्या दुकानातून चोरट्याचे ठसे घेतले. याप्रकरणी दोन्ही घटनांप्रकार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सव्वा लाखाची रोकड केली लंपास
तळमजल्यातून दुसºया मार्गाने तलरेजा हे दुकानात गेले तेथे पाहीले तर सर्व वस्तू जशाच्या तशा होत्या मात्र ड्रॉव्हरमधील सव्वा लाखाची रोख रक्कम चोरट्याने लांबविली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पोलिसांकडे घेतली धाव
माघारी फिरलेला गुरखा प्रकाश हा थेट आरडा-ओरड करत शहर पोलीस स्टेशनमध्ये घुसला तेथे त्याने घडलेली माहिती सांगून पोलिसांना त्वरित चला असे सांगितले मात्र त्याला कुणीही दाद दिली नाही.
गुरख्याने केला पाठलाग
चोरीचा हा प्रकार प्रकाश नामक गुरख्याच्या लक्षात आला. गल्लीच्या तोंडावरून त्याने शिट्टी मारून चोराचा पाठलाग सुरू केला. चोर टॉवर चौक, जनता बॅँक सेवा कार्यालयाकडे जात असताना गुरखा त्याच्या मागे धावत होता. अखेर चोरट्याने हातातील टॉमी मारण्यासाठी उगारल्याने हा गुरखा माघारी फिरला.