आठ वर्षांपासून लाखो टन कचरा प्रक्रियेविना पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:31+5:302021-01-02T04:13:31+5:30
जळगाव - आव्हाणे शिवारातील मनपाच्या बंद घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या आठ वर्षांपासून लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे. ...
जळगाव - आव्हाणे शिवारातील मनपाच्या बंद घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या आठ वर्षांपासून लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे. विशेष म्हणजे चार कोटी रुपयांचा मक्ता देऊन या कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याचे काम वर्षभरापूर्वी देण्यात आले होते. सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, या वर्षभरात मक्तेदाराने ८० हजार घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया केली असून, एक लाख घनमीटर कचऱ्यापेक्षा जास्त कचरा प्रक्रियेविनाच पडून आहे.
मनपाचा घनकचरा प्रकल्प अनेक वर्षांपासून बंद असून, शहरातून दररोज २७० टन कचरा या ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी कुठलीही प्रक्रिया न करताच लाखो मेट्रीक टन कचरा साठला आहे. कचऱ्यामध्ये रासायनिक प्रक्रियेमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढत असून, या आगीच्या धुरामुळे परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मनपाला घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणीसाठी ३० कोटी मंजूर झाले होते. मात्र, तीन वर्षांत या योजनेचा प्रभावी डीपीआर तयार न केल्याने या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्यास मनपा प्रशासनाला अपयश आले आहे.
सर्वच मक्तेदारांकडून काम करवून घेण्यास मनपाला अपयश
मनपा प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा प्रत्यय गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या कामांमधून येत आहे. अमृत योजना असो वा घनकचरा प्रकल्प किंवा एलईडी, सफाईचे काम असो, यासह किरकोळ रस्ते दुरुस्तीचे काम सर्वच कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मनपा प्रशासनाला अपयश आले आहे. कोणत्याही योजनेचे मुदतीत काम झालेले नाही. तसेच एलईडी, सफाई व घनकचऱ्याच्या कामासाठी मनपाने, मक्तेदाराने दोन वेळा संधी दिली असतानाही काम व्यवस्थितरीत्या झालेले नाही.
न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कचरा न जाळता त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र, घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी हा कचरा सर्रासपणे जाळला असल्याने न्यायालयाच्या आदेशाचीच पायमल्ली केली जात आहे. बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी ही प्रक्रिया केवळ नावालाच सुरू असल्याचे दिसून येते.
जैवविविधता समिती नावालाच
राष्ट्रीय हरित लवाद यांच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्यानंतर पुन्हा समिती पुनर्गठीत करण्यात आली. मात्र, शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असतानाही ही समिती नेमके काय काम करत आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
काय आहे बायोमायनिंग
घनकचरा प्रकल्पात साठलेल्या सर्व कचऱ्यावर बायोमायनिंग स्प्रे मारला जातो. त्यामुळे सध्या असलेल्या कचऱ्याचे काही प्रमाणात आकुंचन होऊन त्यानंतर कचऱ्यातून लोखंड, काच, प्लास्टिक, कागद व कपडे यांचे वेगवेगळे संकलन केले जाणार आहे. उर्वरित निरुपयोगी कचऱ्याचा वापर खतासाठी केला जाणार आहे. मात्र, याठिकाणी प्रक्रिया झाल्यानंतर पडलेला कचरादेखील अनेक महिन्यांपासून याचठिकाणी पडून आहे.
कोट..
मक्तेदाराचे काम संशयास्पद आहे. जे काम सहा महिन्यांत पूर्ण व्हायला पाहिजे, ते काम वर्षभरात निम्मेदेखील झालेले नाही. याबाबत मनपा आयुक्तांकडे याबाबतची माहिती मागवली आहे. मक्तेदाराला याबाबत नोटीस बजावून कामाची गती वाढविण्यासोबतच काम नियमात करण्याचे आदेश दिले आहेत.
- सुनील खडके, उपमहापौर