दोन आठवड्यात जळगावातील ‘मेडिकल हब’चे भूमिपूजन - गिरीश महाजन
By विजय.सैतवाल | Published: March 12, 2023 05:52 PM2023-03-12T17:52:33+5:302023-03-12T17:52:58+5:30
दोन आठवड्यात जळगावातील ‘मेडिकल हब’चे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
जळगाव : सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यासाठी घोषणा झालेल्या वैद्यकीय संकूल अर्थात ‘मेडिकल हब’साठी निविदा प्रक्रिया अखेर पूर्ण होऊन कार्यादेशदेखील देण्यात आले आहेत. येत्या दोन आठवड्यात या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणासह अत्याधुनिक रुग्णसेवा उपलब्ध व्हावी म्हणून एप्रिल २०१७मध्ये मोठा गाजावाजा करीत वैद्यकीय संकूल अर्थात ‘मेडिकल हब’ची घोषणा करण्यात आली होती. जळगाव ते औरंगाबाद रस्त्यावर जळगावपासून पाच कि.मी. अंतरावरील चिंचोली येथे हे मेडिकल हब उभारले जाणार आहे. या ठिकाणी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत चिकित्सा महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे फिजिओथेरेपी महाविद्यालय प्रस्तावित आहे.
अशा सर्व पॅथी एकाच ठिकाणी असलेल्या या मेडिकल हबचे काम कधी सुरू होणार, अशी सर्वांना प्रतीक्षा असल्याने यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. यासाठी तब्बल सहा वर्षे गेले असून त्यानंतर निविदा प्रक्रिया झाली व तसे कार्यादेश देण्यात आले आहेत.
५००० कोटींचे कर्ज
जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय संकुलासाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यासाठीच्या कामाचे कार्यादेश दिले गेले असून ७०० कोटी रुपयांचा निधीदेखील संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या सुविधा व सर्व पॅथी एकाच ठिकाणी असलेल्या या संकुलासाठी व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इतर ठिकाणच्या कामासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून पाच हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. त्या माध्यमातून गतीने कामे होणार असल्याचा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
केवळ भूमिपूजन होण्याची वेळ
चिंचोली परिसरात उभारण्यात येणाऱ्या या वैद्यकीय संकुलासाठी सर्व प्रक्रिया झाली असून येत्या दोन आठवड्यात त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे महाजन म्हणाले. केवळ भूमिपूजन होण्याची प्रतीक्षा आहे, त्यानंतर मोठ्या वेगाने हे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुर्वेद महाविद्यालयासाठी ६०० कोटी
दोन आठवड्यात वैद्यकीय संकुलाचे भूमिपूजन तर होणारच आहे, शिवाय लवकरच आयुर्वेद महाविद्यालयासाठीचीही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. त्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.