...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेल्युअर झाले, असं म्हणता आलं असतं- गुलाबराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 01:20 PM2022-06-13T13:20:57+5:302022-06-13T13:21:04+5:30
राज्यसभेच्या निकालानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या टीकेला आता मंत्री गुलाबरावर पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
जळगाव- संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपानं विजय मिळवला आहे. भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी या जागेवर विजय मिळवत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे.
राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडीचे दोन तसेच भाजपाचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. या सहाव्या जागेवर अत्यंत चुरशीची लढत झाली. यामध्ये महाडिकांनी बाजी मारली.
राज्यसभेच्या निकालानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या टीकेला आता मंत्री गुलाबरावर पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा एकही आमदार फुटलेला नाही, पण काही अपक्ष आमदार फुटल्याची चर्चा आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
शिवसेनेची मतं जर इकडे-तिकडे झाली असती, तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेल्युअर झाले असे म्हणता आलं असतं. निवडणुकीत विजय-पराजय सुरू असतं. राजस्थानमध्येही भाजपाची एकच जागा आली मग त्यांच्या प्रभारीने राजीनामा द्यावा, असं म्हणायचं का?, असा सवालही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नावे जाहीर करत, या आमदारांनी आम्हाला मतदान केलं नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात देवेंद्र भुयार यांचंही नाव घेतलं होतं. त्यामुळे, देवेंद्र भुयार यांनी राग व्यक्त करत अगोदर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, हॉटेल ग्रँड हयात येथे जाऊन संजय राऊत यांचीही भेट घेतली.
गैरसमज दूर-
आमचे जे काही गैरसमज होते, ते दूर झाले आहे. ज्यावेळी मतदान प्रक्रिया पार पडली. तेव्हा तिथे मी मत दिले नाही, अशी चर्चा रंगली होती. मत देताना थोडी गडबड केली, १० जणांना थांबायला सांगितले, त्यानंतर दोन जण थांबले असताना मी मतदानाला गेलो. हाच एक गैरसमज होता. मी, मुख्य प्रतोद आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसारच मतदान केले, असे स्पष्टीकरण आपण संजय राऊत यांना दिल्याचे भुयार यांनी सांगितले.