मंत्री जयंत पाटील पॉझिटिव्ह, जिल्हा राष्ट्रवादी क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:10 AM2021-02-19T04:10:26+5:302021-02-19T04:10:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या थेट संपर्कात आलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास १०० पेक्षा जास्त प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना गृहविलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यासोबतच आता ज्यांना जेथे शक्य आहे. तेथे त्यांच्या चाचण्या करण्यावरदेखील भर देण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव, धुळे जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात परिसंवाद यात्रा घेण्यात आली. त्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेतला. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बैठका घेतला. त्यातील काही प्रमुख बैठका या जळगाव शहरात देखील पार पडल्या होत्या. त्यामुळे या बैठकांना उपस्थित असलेले कार्यकर्ते आता चिंतेत पडले आहेत.
मंत्री पाटील यांच्या कारमध्ये जे व्यक्ती त्यांच्यासोबत होते, अशा सर्वांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना जिल्ह्याच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेेत. त्यासोबतच जे लोक स्टेजवर होते. त्यांनी देखील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि स्वत:ला गृह विलगीकरणात ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ही परिसंवाद यात्रा, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, नशिराबाद या सर्व ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
कोट
कार्यकर्त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच शक्य तेथे वैद्यकीय सल्ला घ्यावा. मी स्वत: तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही औषधे घेत आहेत.
- ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी
या परिसंवाद यात्रेत जे पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मंत्री पाटील यांच्या थेट संपर्कात होते. त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच जी मंडळी स्टेजवर होती. त्यांनी गृहविलगीकरणात रहावे. तसेच योग्य ती काळजी घ्यावी
- विकास पवार, पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस.