मंत्री जयंत पाटील पॉझिटिव्ह, जळगावात राष्ट्रवादी क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:44 AM2021-02-20T04:44:23+5:302021-02-20T04:44:23+5:30
फोटो - १४ सीटीआर ७०, ६८ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगावचा दौरा करून मुंबईला गेलेले राज्याचे जलसंपदामंत्री जयंत ...
फोटो - १४ सीटीआर ७०, ६८
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगावचा दौरा करून मुंबईला गेलेले राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापाठोपाठ माजी मंत्री एकनाथ खडसे, रावेरच्या खासदार रक्षा खडसे या देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. ११ ते १३ फेब्रुवारी या काळात त्यांनी जिल्हा दौरा केला. त्यात ते शेकडो लोकांच्या थेट संपर्कात आले. त्यामुळे आता जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्यात धाकधूक निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असे जवळपास १०० जण क्वारंटाईन होत आहेत.
जयंत पाटील यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर या बैठकांना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते आता चिंतेत पडले आहेत. मंत्री पाटील यांच्या कारमध्ये जे व्यक्ती त्यांच्यासोबत होते, अशा सर्वांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना जिल्ह्याच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेेत. त्यासोबतच जे लोक स्टेजवर होते. त्यांनी देखील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि स्वत:ला गृह विलगीकरणात ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
यांचा आला थेट संपर्क
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार अरुणभाई गुजराथी, माजी आमदार डॉ.सतीश पाटील, करण खलाटे, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आमदार मनीष जैन, साहेबराव पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संतोष चौधरी, गुरुमुख जगवाणी, रूपाली चाकणकर, मेहबूब शेख, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, वाल्मीक पाटील, ज्ञानेश मोरे, डी.पी.पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमांना जयंत पाटील यांची उपस्थिती
१) जयंत पाटील यांनी गुरुवारी पाडळसरे, ता. अमळनेर येथे निम्न तापी प्रकल्प भेट त्यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. अमळनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक व राष्ट्रवादी परिवार संवाद, पारोळा येथे एरंडोल विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक घेतली. पाचोरा आणि जामनेर येथे विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक घेतली.
२) शुक्रवारी सकाळी चोपडा येथे न.पा.च्या कामांचे उद्घाटन केले. भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा, फैजपूर. ता यावल येथे देखील विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक.
३) शनिवारी जळगाव येथे त्यांनी पुस्तक प्रकाशन केले. तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात बैठक घेतली. तसेच लेवा भवन येथे जळगाव ग्रामीण आणि छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात जळगाव शहर मतदारसंघाची आढावा बैठक घेतली.
कार्यकर्त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच शक्य तेथे वैद्यकीय सल्ला घ्यावा. मी स्वत: तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही औषधे घेत आहेत.
- ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस