पीजे रेल्वे विस्तारीकरणासाठी ९५५ कोटी मंजूर, रावसाहेब दानवेंची माहिती
By चुडामण.बोरसे | Published: September 25, 2022 06:08 PM2022-09-25T18:08:46+5:302022-09-25T18:09:29+5:30
पीजे रेल्वे विस्तारीकरणासाठी ९५५ कोटी मंजूर अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
जामनेर (जळगाव) : पाचोरा ते जामनेर (पीजे) ब्रॉडगेज व बोदवडपर्यंतच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने ९५५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार आहे. तसेच जालना ते जळगाव या १७४ किमीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी डीपीआर मंजूर झाला आहे, अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी जामनेर येथे केली.
जामनेर येथे रविवारी दुपारी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, रेल्वे अर्थसंकल्पात राज्याला यावेळी सर्वाधिक ११ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर सर्वाधिक कामे राज्यात केली. विमानतळांसारखी चकचकीच रेल्वे स्थानक करावयाची आहेत. खान्देशातून पुण्यासाठी नवीन गाडी सुरु करण्याची मागणी काही जणांनी केली. त्यावर दानवे म्हणाले की, पॅसेंजर चालविणे हे सर्वात तोट्याचे काम आहे. तुम्ही मागणी
करुन तुम्ही तर मोकळे झाले, मात्र नविन गाडी सुरु करणे जिकीरीचे झाले आहे.
जालना - जळगाव नवीन मार्गामुळे खान्देश हा दक्षिण भारताशी जोडला जाईल, असेही दानवे यांनी सांगितले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व नगराध्यक्ष साधना महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकरे, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष साधना महाजन, माजी आमदार स्मिता वाघ आदी उपस्थित होते.