स्वकीयांच्या ‘हल्लाबोल’ने मंत्री घायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:08 PM2018-02-12T23:08:03+5:302018-02-12T23:08:29+5:30

भाजपामधील सुंदोपसुंदीने काँग्रेसचा विक्रम मोडीत; विकास खरोखर ‘गायब’

Minister of the Opposition's 'Attack' | स्वकीयांच्या ‘हल्लाबोल’ने मंत्री घायाळ

स्वकीयांच्या ‘हल्लाबोल’ने मंत्री घायाळ

Next

मिलिंद कुलकर्णी /आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि. १२ - आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त जागांचा प्रश्न घेऊन उपोषणाचा इशारा देणारे एकनाथराव खडसे, सट्टापेढीवर धाड टाकणारे अनिल गोटे हे वास्तवदर्शी प्रश्न घेऊन स्वत:च्या सरकारवर हल्लाबोल करीत आहेत. ्रप्रश्न योग्य आहेच, पण ते मांडण्यामागे सत्ताधारी आमदारांची भूमिका वेगळी आहे. अंतर्गत मतभेदाची, नाराजीची झालर त्या विषयाला आहे. यात ‘विकास’ खरोखर गायब झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे आवडते वाक्य ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे खान्देशातील भाजपाच्या मंडळींनी वेगळ्या अर्थाने घेतले आहे की काय, अशा तºहेने सुंदोपसुंदी सुरू आहे. दुफळी, मतभेद हे काँग्रेसच्या ७० वर्षांतील सत्ताकाळातील मूलभूत गुणधर्म होते. अंतर्गत लोकशाहीचा हा परिपाक आहे, असे त्याचे समर्थन काँग्रेसजन करीत असत. पण अवघ्या ४ वर्षांत भाजपाने ही संस्कृती अंगीकारत विक्रम केला आहे. काँग्रेसमुक्त भारतऐवजी ‘काँग्रेसयुक्त भाजपा’ असे समीकरण झाले आहे. जळगावात एकनाथराव खडसे यांनी ‘विरोधका’ची भूमिका स्वीकारल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, तर धुळ्यात अनिल गोटे यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना घायाळ केले आहे. नवनवीन धमाके फोडत हे स्वकीय मंत्र्यांपुढे अडचणी, तर आपल्याच सरकारला ‘घरचा अहेर’ देत आहे.
२० महिन्यांपासून मंत्रिपदापासून दूर असलेल्या खडसे यांना नजीकच्या काळात मंत्रिपद मिळेल, असे चित्र दिसत नाही. वारंवार नाराजी, असंतुष्टता व्यक्त करूनही पक्षश्रेष्ठी लक्ष देत नसल्याने त्यांनी ‘विरोधका’ची भूमिका अंगीकारली आहे. मुक्ताईनगर, बोदवड व भुसावळ या तीन तालुक्यांपुरते ते सध्या सक्रीय आहेत. स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा १०० कोटींचा गैरव्यवहार असल्याचा आरोप करीत त्यांनी प्रशासनाला कामाला लावले. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दखल घेऊन इतर जिल्ह्यातील पुरवठा अधिकाºयांना पाठवून शासकीय धान्य गोदामांची तपासणी केली. तपासणीचा अहवाल अद्याप आलेला नसला तरी त्या अहवालाने खडसे संतुष्ट होतील, याची काय शाश्वती आहे? त्यामुळे सरकार आणि प्रशासनावर टीकेचा भडिमार कायम राहणार आहे.
अशीच अवस्था राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या विषयाची आहे. खडसे हे पालकमंत्री असताना या कामाचे भूमिपूजन केंद्र्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. परंतु नंतर या कामाची गती थांबली. चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा गती आली. फागणे ते तरसोद या टप्प्याचे काम सुरू झाले, मात्र तरसोद ते चिखली या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. ठेकेदाराने काम सोडल्याची माहिती खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दुसरीकडे जळगावातून जाणाºया महामार्गाला समांतर रस्ते व चौपदरीकरणासाठी १०० कोटी रुपये निधी मंजूर करवून आणल्याचे श्रेय स्वत:कडे घेणारे खडसे आता हा रस्ता महापालिकेकडे असल्याने निधी मिळणार नाही, असा दावा करीत आहे. खासदार ए.टी.पाटील यांनी हा दावा खोडून काढत महामार्ग ‘नही’कडे वर्ग झाल्याचे सांगितल्याने नेमके कोण खरे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागातील रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त जागांमुळे सामान्य जनतेचे हाल होत असल्याचा मुद्दा घेत, खडसे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्दा उचलत असताना खडसे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व त्यांचे समर्थक आमदार आपापल्या मतदारसंघात महाआरोग्य शिबिरे घेत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाची कामे जळगावात सुरू झाली आहेत. असे असताना ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य सेवा कशी हलाखीची आहे, हे खडसे अधोरेखित करीत आहेत. आरोग्य खाते शिवसेनेच्या डॉ.दीपक सावंत यांच्याकडे आहे. शिवसेनेचे पदाधिकारी मुक्ताईनगर, धरणगावात आरोग्य प्रश्नांविषयी आक्रमक भूमिका घेत असताना त्यांचे मंत्री दुर्लक्ष करीत असल्याचे खडसे यांनी चपखलपणे लक्षात आणून दिले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जळगावपेक्षा कोल्हापूर, सांगली हे जिल्हे महत्त्वाचे वाटतात हे आता लपून राहिलेले नाही. जळगावचा दौरा पूर्वी तीन महिन्याने व्हायचा, तो आता १५ दिवसांवर आला असला तरी सार्वजनिक कार्यक्रम आणि तेही अर्ध्या दिवसाचा दौरा असे त्याचे स्वरूप आहे. त्यामुळे शासकीय अधिकाºयांचा बैठका, आढावा, लोकप्रतिनिधींचे गाºहाणे ऐकणे यासाठी त्यांना वेळ उरलेला नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा नसल्याने त्यांनी केवळ जामनेर या आपल्या मतदारसंघापुरते स्वत:ला सीमित करून घेतले आहे. दोन महिन्यात तेथे पालिकेची निवडणूक असल्याने त्यांना ते कारणदेखील मिळाले आहे.
या पार्श्वभूमीवर खडसे यांच्या भूमिकेला जनतेचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘विकास वेडा झाला’ हे विधान गाजले होते, तसेच खान्देशात ‘विकास गायब झाला’ असे म्हणायची वेळ जनतेवर आली आहे.
तिकडे धुळ्यात धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर राष्टÑवादी काँग्रेसचे नेते नवनवीन आरोपांचे फटाके फोडत असताना आमदार अनिल गोटे यांनी महामार्गासाठी भूसंपादित जमिनीत १३५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून धुरळा आणखी गडद केला आहे. धुळ्यातील सट्टापेढीवर धाड टाकून शिवसेनेचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत गृहमंत्रालय असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कारभाराकडे अंगुलीनिर्देश केला आहे. गोटे हे खडसे समर्थक असल्याने सरकारविरोधी भूमिकेचे समान सूत्र तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे.
स्वकीय सरकारवर टीकेची झोड उठवित असताना काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसची मंडळी मात्र दिल्ली-मुंबईकडे डोळे लावून बसली आहे. आंदोलनाचा आदेश आला तरच रस्त्यावर यायचे, नाही तर आपले घरात बसलेले बरे, अशा सुरक्षित मानसिकतेत विरोधी पक्ष आहे.
आंदोलन तुमचे अन् आमचे, प्रतिभा शिंदे यांच्या लोकसंघर्ष मोर्चाच्या आंदोलनाला जिल्हाधिकारी सामोरे न गेल्याने वाद उद्भवला. महिनाभरापूर्वी रास्ता रोकोला जिल्हाधिकारी आले होते, मग आता का नाही? असा मुद्दा आल्याने जुन्या-नव्या आंदोलनकर्त्यांमध्ये मतभेद उफाळले. सामान्यांच्या प्रश्नांवर लढणाºयांमधील असे वाद दुर्दैवी म्हणायला हवे.
जिल्हाधिकाºयांची ठोस भूमिका हवी, डॉ.सतीश पाटील यांच्या आंदोलनाच्यावेळी असाच वाद उद्भवला होता. आतादेखील मंत्री गिरीश महाजन आल्यानंतर जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी आले. हेच आदल्या दिवशी झाले असते तर आंदोलन ताणले गेले नसते. जिल्हाधिकाºयांनी ठोस भूमिका घेतल्यास वादाचे प्रसंग टाळता येतील.

Web Title: Minister of the Opposition's 'Attack'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.