मंत्री, आमदारांनो, जळगावला याल तर हाती पडतील पुस्तकं; ‘हारतुरे’ हद्दपार, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 07:15 PM2023-09-14T19:15:55+5:302023-09-14T19:16:21+5:30
सतत हाती पडत गेलेल्या हारतुरे आणि पुष्पगुच्छांमुळे वैतागलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या प्रथेविरोधात नाराजी व्यक्त केली होती.
कुंदन पाटील
जळगाव: सतत हाती पडत गेलेल्या हारतुरे आणि पुष्पगुच्छांमुळे वैतागलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या प्रथेविरोधात नाराजी व्यक्त केली तेव्हा त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ‘हारतुरे’ व ‘पुष्पगुच्छ’ देऊन स्वागत करण्याची प्रथा मोडीत काढली आहे. यापुढे शासकीय कार्यक्रमात प्रत्येक मान्यवरांचे स्वागत पुस्तकं देऊनच करायचे, असा आदेश बुधवारी काढला आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली की नाही, याची पडताळणीही त्यांनी गुरुवारी केली.
तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाचोरा दौऱ्यावर होते. हेलिपॅडवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने व आमदारांच्यावतीने त्यांचे हारतुरे, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यापापाठोपाठ विविध ठिकाणी त्यांचे स्वागतही झाले. स्वागताला पुन्हा हारतुरे देण्यात आले. कार्यक्रमस्थळीही तोच प्रवास कायम होता. तेव्हा वैतागलेल्या शिंदे व पवार यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे स्वागतासाठी असणाऱ्या या प्रथेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकाऱ्यांनी शासकी कार्यक्रमात हारतुरे, पुष्पगुच्छांऐवजी पुस्तकं भेट देण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश सर्वच यंत्रणांना दिले.
हारतुऱ्यांच्या खर्चात पुस्तकांची खरेदी
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यशदा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसकरवी उपयुक्त पुस्तकांची यादी उपलब्ध केली आहे. ती ऐच्छिक आहे. तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे नोडल ऑफिसर म्हणून नेमले आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकरवी उपयुक्त पुस्तकांना उपलब्ध करुन यापुढे ती भेट देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच मान्यवरांसह विविध संस्थाकडून उपलब्ध होणारी पुस्तकं जिल्हा ग्रंथालयाने ग्रामीण भागातील वाचनालय, अभ्यास केंद्र आणि विद्यार्थ्यांना मोफत पुरविली जाणार आहे. त्यात शाहू, फुले, आंबेडकर ग्रामअभ्यासिका,युपीएससी, एमपीएससी, सार्वजनिक प्रशासन, भारतीय इतिहासाच्या पुस्तकांचा समावेश आहे.ही पुस्तके जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रे आणि ग्रंथालयांनाभेट देण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे,
कार्यक्रमानंतर हारतुरे, पुष्पगुच्छ फेकावी लागतात. त्यामुळे खर्चही वाया जातो. त्यामुळे हा खर्च सार्थकी लागावा आणि ‘पुस्तकं माणसाला रद्दी होण्यापासून वाचवितात’ हा विचार रुजत जावा, यादृष्टीने हा निर्णय घेतला आहे. - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.