गावठी पिस्टलातून गोळी सुटून अल्पवयीन मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 10:11 PM2021-03-12T22:11:01+5:302021-03-12T22:11:29+5:30

अल्पवयीनाने गावठी पिस्टल काढत असताना त्यातून गोळी सुटल्याने ती डाव्या पायाच्या मांडीवर लागल्याने मोठा रक्तस्राव झाला.

A minor boy was injured when a bullet fired from a village pistol | गावठी पिस्टलातून गोळी सुटून अल्पवयीन मुलगा जखमी

गावठी पिस्टलातून गोळी सुटून अल्पवयीन मुलगा जखमी

Next
ठळक मुद्देभुसावळातील प्रकार : लुटारूंनी हल्ला केल्याचा केला बनाव; तिघे ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : तालुक्यातील खडका येथे चौघे मित्र एका ठिकाणी बसले असतानाच त्यातील अल्पवयीनाने आपल्याजवळील गावठी पिस्टल काढत असताना त्यातून गोळी सुटल्याने ती  अल्पवयीनाच्या डाव्या पायाच्या मांडीवर लागल्याने मोठा रक्तस्राव झाला.  गुरुवारी रात्री १०.३० च्या दरम्यान ही घटना घडली. हे प्रकरण वाढून आपल्यावर गुन्हा दाखल न होण्यासाठी या  मित्रांनी या प्रकरणाला वेगळे वळण देत   खडका मिलजवळ तीन संशयितांनी लूट करण्याचा प्रयत्न केला मात्र ऐवज न दिल्याने संशयिताने गोळीबार केल्याचा बनाव करून तशी माहिती तालुका पोलिसांना रात्री उशिरा दिली.  या प्रकरणाची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.

या प्रकाराने पोलीस यंत्रणा पुरती हादरली व कामाला लागली. जखमी अल्पवयीन मुलास तातडीने उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात हलविण्यात आले तर  त्याच्यासोबत असणाऱ्यांनी दिलेल्या घटनास्थळावर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व सहकाऱ्यांनी धाव घेत स्पॉट व्हेरीफिकेशन केले. मात्र, तेथे रक्ताचे डाग वा काही अप्रिय घडले नसल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. 

चौकशीअंती समोर आली माहिती

अखेर जखमीसोबत असलेल्या मित्रांची खोलवर चौकशी केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला.  लूट झाली नसल्याची कबुलीच या वेळी मिळाली. 

तिघांना अटक

लूट झाली नसताना पोलिसांना खोटी माहिती देऊन प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तालुका पोलिसांना चेतन सपकाळे, पवन सपकाळे, सचिन सपकाळे व सूरज कोळी यांना शुक्रवारी अटक केली. संशयितांनी अल्पवयीनाकडून पिस्टल हाताळताना गोळी सुटून त्याच्या पायास लागल्याची माहिती दिली. 

पिस्टल आणले कोठून?
 संशयिताने हे पिस्टल कुठून व कोणत्या उद्देशाने आणले? याचा खोलवर तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी अल्पवयीनासह वरील चार संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी अल्पवयीनावर उपचार सुरू असून, अन्य चौघा सज्ञान आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक अनिल मोरे, सहा. निरीक्षक गणेश धुमाळ, सहा. निरीक्षक अमोल पवार व कर्मचाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले.

Web Title: A minor boy was injured when a bullet fired from a village pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.