लॉकडाऊनमध्ये अल्पवयीन मुली लॉक;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:43+5:302021-06-29T04:12:43+5:30
स्टार ८४३ कोरोनामुळे शाळा, क्लास बंद असल्याने बाहेर फिरण्यास निर्बंध जळगाव : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी दीड वर्षात २६५ ...
स्टार ८४३
कोरोनामुळे शाळा, क्लास बंद असल्याने बाहेर फिरण्यास निर्बंध
जळगाव : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी दीड वर्षात २६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या आहेत. २०१८ पासून मे २०२१ पर्यंत तब्बल ६८४ मुली बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४९१ मुलींचा शोध लागलेला आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत ८८ मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ३९ मुली मिळून आलेल्या आहेत. ४९ मुलींचा अद्यापही शोध लागलेला नाही. कोराना काळात अनेक निर्बंध आल्याने अल्पवयीन मुली घरातच लॉक झाल्या आहेत. त्यामुळे यंदा मुली बेपत्ता होण्याचा आकडा कमी आहे.
जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०२० या कालावधीत ४ हजार ८२८ हरविलेल्या, पळविलेल्या महिला व मुलींची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. अल्पवयीन मुलगी हरवलेली किंवा पळवून नेलेली असली तर त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल होतो, त्यामुळे ही संख्या देखील कमी नाही. बहुतांश प्रकरणांत महिला व मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस दप्तरी मात्र, अशा प्रकरणात अपहरणाचा आकडा मोठा दिसतो, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते.
दरम्यान, जानेवारी ते मे या कोरोनाच्या पाच महिन्यांत ८८ मुली बेपत्ता झालेल्या आहेत. जिल्ह्यातून मुलींसोबतच ६५८ मुलेही बेपत्ता झाली आहेत. त्यात १८ वर्षांच्या आतील ६५ मुलांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी ३२३ मुलांचा शोध लागलेला आहे.
४९ मुलींचा शोध लागेना
जानेवारी ते मे या पाच महिन्यांत जिल्ह्यातून पलायन केलेल्या ८८ पैकी ३९ मुलींचा शोध लागला आहे, तर ४९ मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही. गेल्या वर्षी देखील १७७ मुली बेपत्ता झाल्या होत्या, त्यापैकी १५२ मुलींचा शोध लागला होता, तर १२५ मुलींचा शोधच लागला नाही. एकूणच लॉकडाऊन व कोरोना यामुळे मुली बेपत्ता होण्याचे किंचित प्रमाण घटले आहे.
कोरोनाच ठरला शोधकार्यात अडथळा
कोरोनामुळे बाहेर जिल्हा व इतर राज्यांत तपासाला जायला अडचणी येऊ लागल्या. राज्य सोडून जायचे असेल तर त्यासाठी पोलीस अधीक्षकांची परवानगी लागते. कोरोना काळात बस व रेल्वे सेवा बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही मुलींकडे मोबाइलच नसल्याने तपासाच्या दृष्टिकोनातून आणखी अडचणी निर्माण होऊ लागल्या. ज्या मुलींचा शोध लागला आहे, त्यातील काही मुली बालनिरीक्षणगृहात तर काही मुली पालकांकडे गेल्या आहेत.
अल्पवयीन मुली बेपत्ता
२०१८ -१७०
२०१९-१८८
२०२०-१७७
२०२१ (मेपर्यंत) -८८
कोट....
अल्पवयीन मुली बेपत्ता होणे हा चिंतेचा विषय आहे. आपला पाल्य काय करतो, याकडे पालकांनीच सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे. पोलिसांनी अनेक मुली शोधून काढल्या आहेत. सज्ञान नसलेले मुलं, मुली पालकांच्याच स्वाधीन केलेले आहेत. ज्या मुलीने नकार दिला तिला मुलींच्या निरीक्षणगृहात पाठविण्यात येते. मुला-मुलींचे विषय आपण स्वत:च गांभीर्याने घेऊन पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतो.
- चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक