गौण खनिज सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 09:38 PM2019-12-21T21:38:35+5:302019-12-21T21:39:33+5:30

विश्लेषण

Minor Minerals | गौण खनिज सुसाट

गौण खनिज सुसाट

Next

जळगाव : जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असली तरीही वाळू वाहतूक सुरूच असून तीन दिवसात एकूण आठ वाहने जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असून तीन दिवसांपूर्वी बांभोरी येथील वाळू गटही रद्द करण्यात आल्याने वाळू उपशास आळा बसणे अपेक्षित आहे. असे असले तरी राजरोसपणे वाळू वाहतूक सुरुच असल्याचे समोर येत आहे.
गुरुवारीदेखील तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर सावखेडा शिवारात नदी पात्रामध्ये पकडले होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी निमेखडी शिवारातील नदीपात्रातून वाळूची चोरी करताना दोन ट्रॅक्टर प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने पकडले.
यात खंड न पडता पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री मुरुमाची तीन व खडीची वाहतूक करणारे एक डंपर तर वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले आहे. हे पाचही वाहने जामनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या कामासाठी या गौण खनिजाची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जात असून या मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास सर्रासपणे गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारीही वाढत आहे. गेल्याच महिन्यात महामार्गाच्या कामासाठी मुरूमचा अवैधरित्या उपसा करून त्याची वाहतूक करीत असलेले दोन डंपर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनाच आढळून आले होते. क्षमतेपेक्षा अधिक मुरूमचा उपसा केल्याने त्या डंपर मालकांला एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला होता, तरीदेखील हा उपसा सुरूच आहे.
जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असताना वाळूचा बेसुमार उपसा सुरू असल्याचे दररोज समोर येत आहे. या सोबतच मुरुम, खडी यांचीही अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यात सध्या जळगाव-औरंगाबाद मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्या कामासाठी या मार्गावरुन गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहने सुसाट जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री महसूल विभागाचे पथक जळगाव-औरंगाबाद मार्गावर गस्त घालत असताना जामनेर तालुक्यातील पाळधीनजीक गौण खनिजाची वाहतूक करणारे चार डंपर पथकाला आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यात तीन डंपरमध्ये मुरुम तर एका डंपरमध्ये खडी आढळून आली. कागदपत्रांची विचारणा केली असता गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी असणाऱ्या पावत्यांवर महसूल विभागाचा शिक्का नव्हता व परवानाही नव्हता. पहाटे चार वाजता ही चारही डंपर जामनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. तत्पूर्वी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नेरी येथे जामनेर फाट्यानजीक वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टरही आढळून आले. तेदेखील जप्त करण्यात येऊन जामनेर पोलीस ठाण्यात लावण्यात आले.
संध्याकाळी सहा वाजेनंतर महामार्गाचे काम करू नये, असे शासनाचे १३ जानेवारी २०१८चे परिपत्रक आहे. मात्र, जळगाव-औरंगाबाद मार्गाच्या कामासाठी मध्यरात्रीच्या वेळी गौण खनिजाची सर्रास वाहतूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहे.

 

Web Title: Minor Minerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव