खेळता-खेळता अचानक बेपत्ता बालक सापडले मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:57+5:302021-04-25T04:14:57+5:30
जळगाव स्टेशनवरील घटना : लोहमार्ग पोलिसांना बालक गवसला मुंबईत माता झाली ‘सैरभैर’ : लोहमार्ग पोलिसांनी फिरविली तपासाची चक्रे लोकमत ...
जळगाव स्टेशनवरील घटना : लोहमार्ग पोलिसांना बालक गवसला मुंबईत
माता झाली ‘सैरभैर’ : लोहमार्ग पोलिसांनी फिरविली तपासाची चक्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वे स्टेशनवर भाकर मागून जगणाऱ्या महिलेचे सहावर्षीय बालक अचानक खेळता- खेळता बेपत्ता झाले. स्टेशन परिसरात सर्वत्र शोधूनही बालक दिसत नसल्यामुळे सैरभैर झालेल्या महिलेने प्रचंड आक्रोश केला. यावेळी लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरविल्यानंतर हे बालक मुंबईत आढळून आले असून, त्याला लवकर जळगावात आणून ‘त्या’ मातेच्या स्वाधीन करणार असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
जबलपूर येथील महिला आपल्या पतीसह दोन लहान बालकांना घेऊन जळगावात गेल्या आठवड्यापासून उदरनिर्वाहसाठी आली आहे. काजल ठाकूर, असे या महिलेचे नाव असून, सुनील ठाकूर हे तिच्या पतीचे नाव आहे. स्टेशनवर हे ठाकूर कुटुंब प्रवाशांकडून कधी पैसे, तर कधी खाण्याची जी वस्तू मिळेल, त्यावर आपला उदरनिर्वाह करीत आहे. नुकताच काजल ठाकूर यांचा मुलगा स्टेशन परिसरात खेळत असताना, अचानक बेपत्ता झाला. एका पायाने दिव्यांग असलेल्या सुनील ठाकूर यांनी मुलाचा सर्वत्र शोध घ्यायला सुरुवात केली. रेल्वे स्टेशनच्या परिसरात सर्वत्र शोध घेऊनही सायंकाळ होऊनही मुलगा डोळ्याला दिसत नसल्यामुळे काजल यांनी तिकीट खिडकीच्या आवारात रडायला सुरुवात केली. अंगावर मळकट व फाटलेले कपडे असलेल्या या महिलेचा आक्रोश पाहून स्टेशनवरील इतर प्रवाशांनाही गहिवरून आले. सुनील ठाकूर यांनी लोहमार्ग पोलिसांना मुलगा बेपत्ता झाल्याचे सांगितल्यानंतर, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपासाला सुरुवात केली.
इन्फो :
पोलिसांच्या तपासात बालक गवसले मुंबईत
पित्याने बालक बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर जळगाव लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे यांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे हलविली. सुरुवातीला रेल्वे स्टेशनच्या बाहेरील व आतमधील सीसीटीव्ही पाहणी करून बालकाचा शोध घेण्यात आला. यावेळी बालक दुपारी २ वाजता मुंबईकडे जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये चढताना आढळून आले. त्यानंतर गौतम सोनकांबळे यांनी लागलीच पोलीस हवालदार सचिन कुमार भावसार व नरेंद्र चौधरी यांना बालकाच्या शोधासाठी मुंबईला पाठवले व स्वतः नाशिकला रवाना झाले. सोनकांबळे यांना नाशिकलाही हा मुलगा मिळून आला नाही. गीतांजली एक्स्प्रेसचा अखेरचा थांबा असलेल्या सीएसटी स्टेशनवर हवालदार सचिन कुमार भावसार यांनी या बालकाचा तपास केला. यावेळी त्यांना या बालकाला तेथील लहान बालकांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेमार्फत माटुंगा येथील बालनिरीक्षण गृहात दाखल केले असल्याचे समजले.
इन्फो :
मुलगा सापडला आणि व्हिडिओ काॅलवर केले बोलणे
यानंतर सचिन कुमार भावसार यांनी बालक माटुंगा येथील एका बाल निरीक्षणगृहात असल्याची माहिती दिली. मुलगा सापडला असल्याचे समजल्यावर काजल ठाकूर हिचा आक्रोश शांत झाला. यावेळी सचिन कुमार भावसार यांनी गौतम सोनकांबळे यांच्या मोबाइलवर व्हिडिओ कॉल करून, मुलाचे आणि त्या मातेचे बोलणेही करून दिले. मुलाशी बोलणे झाल्यानंतर त्या मातेला गगनात मावेनासा आनंद झाला.