खड्डयाला चुकविताना दुचाकी कोसळली अन् मागून ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:42 AM2019-08-23T11:42:06+5:302019-08-23T11:42:56+5:30

महामार्गावर अपघात : अंगावर टायर गेल्याने कमरेपासून वेगळा झाला पाय; दुसरा विद्यार्थी जखमी

 Missing the pit, the bike fell and the truck crushed it from behind | खड्डयाला चुकविताना दुचाकी कोसळली अन् मागून ट्रकने चिरडले

खड्डयाला चुकविताना दुचाकी कोसळली अन् मागून ट्रकने चिरडले

Next

जळगाव : मित्राला सोबत घेऊन दुचाकीने शहराकडे येत असताना महामार्गावरील खड्डा चुकविण्यासाठी रस्त्याच्याखाली दुचाकी घेताना खराब साईडपट्टीमुळे दुचाकी कोसळली आणि त्यामुळे सौरभ गोपालदास मनवानी (१९, रा. हनुमान नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) हा महामार्गावर पडला, त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्याला चिरडले व त्यात त्याचा जागेवरच अंत झाला. अपघात इतका भयंकर होता की, सौरभ याच्या कमरेपासून पाय वेगळा झाला. गुरुवारी दुपारी चार वाजता आहुजा नगराजवळ हा अपघात झाला. त्यात सौरभचा मित्र हर्षल शांताराम सपकाळे (१९,रा.बोदवड) हा जखमी झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ हा वडील गोपालदास आई, लक्ष्मी व लहान भाऊ स्वयंम यांच्यासोबत भुसावळ येथे वास्तव्यास होता. सौरभ हा बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वषार्ला शिक्षण घेत होता. त्यासाठी तो दुचाकीने भुसावळ येथून अपडाऊन करत होता. सौरभ गुरुवारीही सकाळी बांभोरी महाविद्यालयात आला होता. दुपारी महाविद्यालयातून निघाल्यावर दुचाकीने (एम.एच.१९ डी.के. ८३०३) भुसावळला घरी जाण्यासाठी निघाला. यावेळी वर्गातील हर्षल सपकाळे हा मित्र भेटला. हर्षलने सौरभला मलाही गावात यायचे आहे, असे सांगितले. यानंतर सौरभने त्याला दुचाकी चालवायचे सांगून तो मागे बसला.

मुलाचा मृतदेह पाहताच वडील बेशुध्द
अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच महाविद्यालयाचे शिक्षक भागवत पाटील व विद्यार्थी सागर सोनवणे, पीयुष मन्यार, हर्षल सोमाणी, योगेश सोनवणे यांनी सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले. डॉ. कुरकुरे यांनी मृत घोषित केले. तर दुसरीकडे हर्षल सपकाळे हा जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. मानसिक धक्का बसू नये म्हणून त्याच्यापासून सौरभ मयत झाल्याची माहिती लपविण्यात आली होती. नातेवाईकांच्या माहितीनुसार सौरभचे वडील व आई यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. याठिकाणी सौरभचा पाय व शरीर वेगळा झालेला मृतदेह पाहताच सौरभची आईसह लहान भावाने हंबरडा फोडला तर वडील बेशुध्द पडले. लोकांनी त्यांच्या तोंडावर पाणी मारले तेव्हा काही वेळाने ते शुध्दीवर आले मात्र त्यांचे भान हरपले होते.

मुख्यमंत्र्यांचा दौरा, रस्त्याची डागडुजी अन् सौरभचा बळी
मुख्यमंत्री शुक्रवारी जिल्हा दौºयावर असल्यामुळे महामार्गावर गुरुवारी खड्डे बुजविण्याचे तसेच मलमपट्टी करण्याचे काम सुरु होती. अनेक वषार्पासून खड्डे असलेल्या महामार्गाच्या किमान खड्डयाचे भाग्य उजळले होते. महामार्गावरील सुरु असलेल्या कामासाठी वाहने थांबविण्यात येत होती. पुढे आहुजा नगराजवळ सौरभने रस्त्यावरील खड्डा चुकविण्यासाठी दुचाकी साईडपट्टीवर घेतली, मात्र त्यात पाणी साचल्याने मोठा खड्डा होता. त्यामुळे दुचाकी कोसळली अन् सौरभ महामार्गाच्या दिशेने तर हर्षल विरुध्द दिशेने पडला. सौरभ महामार्गावर पडल्याने मागून भरधाव येत असलेल्या ट्रकने महामार्गावर पडलेल्या सौरभला चिरडले.

Web Title:  Missing the pit, the bike fell and the truck crushed it from behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.