बेपत्ता वायरमनचा पद्मालयच्या जंगलात मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 11:38 PM2021-03-06T23:38:58+5:302021-03-06T23:39:58+5:30

बोरगाव, ता. धरणगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर कृष्णा चव्हाण (२३) या तरूणाचा मृतदेह सात दिवसांनी आढळला आहे.

Missing Wireman's body in the forest of Padmalaya | बेपत्ता वायरमनचा पद्मालयच्या जंगलात मृतदेह

बेपत्ता वायरमनचा पद्मालयच्या जंगलात मृतदेह

Next
ठळक मुद्देजंगलातच घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क

एरंडोल : बोरगाव, ता. धरणगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर कृष्णा चव्हाण (२३) हा तरुण एरंडोल येथे वीज महावितरण कंपनीत जवळपास ३ वर्षांपासून झिरो वायरमन म्हणून काम करीत होता. तो जवळपास सात-आठ दिवसांपूर्वी घरून निघाला होता. तो आज येईल, उद्या येईल, म्हणून आईवडिलांसह घरातील इतर लोक वाट पाहत असताना शनिवारी सकाळी पद्मालयच्या जंगलात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. 

हे वृत्त कळताच ज्ञानेश्वरच्या आईवडिलांनी व कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला. विशेष हे की त्याचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले. त्याने आत्महत्या पाच ते सहा दिवसांपूर्वी केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. 

कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरल्याची माहिती पद्मालय व गलापूर येथील ग्रामस्थांना कळल्यावर त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला याबाबत कळविले. त्याठिकाणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, संदीप सातपुते, अकील मुजावर, जुबेर खाटीक, संदीप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यावेळी गलापूरचे माजी सरपंच शेख आरिफ पठाण, उपसरपंच पद्मालय अर्जुन मोरे, आबा वाणी यांनी घटनास्थळी पोलिसांना सहकार्य केले.
ग्रामीण रुग्णालयातील डॉ.मुकेश चौधरी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. ज्ञानेश्वर हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जुबेर खाटीक व अकील मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.

पोलिस निरीक्षक बालंबाल बचावले

दरम्यान मृतदेह अशा ठिकाणी होता, ज्याठिकाणी कोणीही जाऊ शकत नव्हते. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे स्वतः खाली उतरत असताना दरीत कोसळण्यापासून बालंबाल वाचले. त्यांना आबा वाणी यांनी वाचवले. मृताच्या खिशात दुचाकीची चावी, मोबाइल, पाकीट व ओळखपत्र मिळून आले. 

Web Title: Missing Wireman's body in the forest of Padmalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.