राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून आता तीन जिल्ह्यात मिशन ‘एनईपी’ 

By अमित महाबळ | Published: January 3, 2024 07:31 PM2024-01-03T19:31:26+5:302024-01-03T19:31:39+5:30

६२ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे

Mission 'NEP' now in three districts to create public awareness about National Education Policy | राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून आता तीन जिल्ह्यात मिशन ‘एनईपी’ 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून आता तीन जिल्ह्यात मिशन ‘एनईपी’ 

अमित महाबळ, जळगाव: पदवीस्तरावर येत्या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने दि. ९ व १० जानेवारी २०२४ रोजी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ६२ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात विद्यापीठाशी संलग्न प्राचार्य, प्राधिकरणाचे सदस्य, संस्थाचालक यांच्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यापीठात कार्यशाळा घेण्यात आली होती. त्याचवेळी विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत या धोरणाची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळा घेण्यात येतील, असे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी जाहीर केले होते. जळगाव जिल्ह्यातील ३४, धुळे जिल्ह्यातील १९ आणि नंदुरबार जिल्ह्यातील ९ महाविद्यालयात दि.९ व १० जानेवारी रोजी दोन सत्रांमध्ये या कार्यशाळा होणार आहेत. ज्या महाविद्यालयात या कार्यशाळा होणार आहेत. त्या महाविद्यालयाच्या परिसरातील इतर महाविद्यालयांना देखील आयोजक महाविद्यालयांच्या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या वतीने या कार्यशाळा होत असल्याची माहिती कक्षाचे संचालक प्रा. समीर नारखेडे यांनी दिली.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांची बैठक बुधवार दि. ३ जानेवारी रोजी विद्यापीठात घेण्यात आली. या बैठकीत कुलगुरूंनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. जगदीश पाटील हे उपस्थित होते.

कार्यशाळा महत्त्वाची कारण...

या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाने २१ तज्ज्ञांची टीम तयार केली असून, आयोजक महाविद्यालयांमध्ये जावून हे तज्ज्ञ पदवी स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण कशा पद्धतीने लागू होणार आहे, ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रम कसा असणार आहे यामधील मेजर आणि मायनर विषय म्हणजे काय आदी बाबत सविस्तर माहिती देऊन शंकांचे निरसन करणार आहेत. एका कार्यशाळेत १५० ते २० विद्यार्थी अपेक्षित आहेत. जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत दोन दिवसात हे धोरण पोहचविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

कार्यशाळेला कोण अपेक्षित...

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमधील १२ वी प्रवेशित विद्यार्थी, पदवी अंतिम वर्षातील विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना या कार्यशाळेसाठी पाचारण करण्यात आले आहे.

Web Title: Mission 'NEP' now in three districts to create public awareness about National Education Policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.