केळी पीकविमा योजनेत आकड्यांचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:15 AM2021-07-25T04:15:52+5:302021-07-25T04:15:52+5:30
चोपडा : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२०-२१ मध्ये परताव्यासंबंधीची परिमाणके किंवा परतावा निकष बदलल्याचा चांगलाच लाभ विमा कंपनी ...
चोपडा : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२०-२१ मध्ये परताव्यासंबंधीची परिमाणके किंवा परतावा निकष बदलल्याचा चांगलाच लाभ विमा कंपनी व संबंधित घेण्याच्या स्थितीत आहेत. या योजनेत काही मंडळांमधील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी परताव्यांचा किरकोळ लाभ देण्यासाठी तापमान व इतर आकडेवारीत घोळ करण्यात आल्याचा आरोप होत आहे. योजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी शरद जोशी प्रणित व रघुनाथ पाटील राज्य शेतकरी संघटनेने केली आहे.
या योजनेत तापमानासंबंधी आकड्यांमध्ये घोळ करून, फक्त भोकर, भालोद व अडावद या तीनच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी परतावे देण्यासाठी अनेकांना मॅनेज करण्यात आले, असा आरोप राज्य शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण गुर्जर यांनी केला आहे. गुर्जर यांनी याबाबत विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक समाधान पाटील व अधिकारी देविदास कोळी यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधून आपले म्हणणे मांडले. त्यात गुर्जर यांनी तापमानाचे आकडे मॅनेज करून, भोकर व इतर मंडळांमधील काहीच शेतकऱ्यांना परतावे मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला, तसेच याबाबत सर्व बाबी बाहेर आणल्या जातील. आंदोलन छेडू. भोकर नजीकचे पिंप्राळा व यावलमधील इतर मंडळे, चोपड्यातील गोरगावले व इतर मंहसूल मंडळही परताव्यांसाठी पात्र ठरायला हवे. भोकर येथे मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंश सेल्सिअस तापमान होते, त्याच वेळी अशी नोंद पिंप्राळा व गोरगावले येथील हवामान केंद्रात कशी झाली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला. त्यांनी त्यावर हवामान केंद्र हे स्कायमेट कंपनीचे आहेत. आकडे शासन आम्हाला पुरविते. आपण ते माहितीच्या अधिकारात मागवा. आकडे चुकीचे असतील, तर आमच्या कंपनीचे परतावे वाचतील, कंपनीलाच फायदा होईल, असे कंपनीचे कोळी यांनी गुर्जर यांना मोबाइलवरून संवाद साधताना सांगितले. या वर्षी विमा कंपन्यांना जवळपास ५० कोटींपर्यंत फायदा होण्याची शक्यता आहे, असे गुजर यांनी सांगितले.
यातच शरद जोशी संघटनेचे माजी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कडू पाटील यांनीही विमा कंपनीच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही शेतकरी तुपाशी व काही उपाशी असा प्रकार होऊ नये. विमा कंपनीला योजनेत सहभागी शेतकऱ्याने १५ हजार रुपये विमा हप्त्यापोटी दिले असतील, तर त्याला किमान १२ हजार रुपये परतावा मिळायला हवा. कोविड, महागाईत शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशात शेतकऱ्यांचे आकडे मॅनेज करून पिळवणूक करणे, निकष बदलून फसवणूक, लुबाडणूक करणे योग्य नाही. योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना परतावे दिले जावेत, असेही गुर्जर व कडू यांनी म्हटले आहे.
चोपडा तालुक्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी हवामान मापक यंत्र बसविले आहेत. त्या यंत्राद्वारे तापमान किंवा थंड वारे किंवा उष्ण वारे याबाबतची सर्व माहिती ऑनलाइन जात असते. त्यात कोणाला काही हस्तक्षेप करता येत नाही, परंतु यंत्रात बिघाड झाला असल्यास, त्याला कृषी विभाग काहीही करू शकत नाही. त्याबाबतीत ही यंत्रे कोणत्या कंपनीची आहेत, त्या कंपनीचे अधिकारी अधिक सांगू शकतील.
- प्रशांत देसाई, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, चोपडा