आमदार किशोर पाटील यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:11+5:302021-06-09T04:20:11+5:30
पाचोरा येथील गिरड रोडवर असलेल्या महावितरण कार्यालयात ताला ठोको आंदोलन केले. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह येथील ...
पाचोरा येथील गिरड रोडवर असलेल्या महावितरण कार्यालयात ताला ठोको आंदोलन केले. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह येथील महावितरण कार्यालयाच्या दाराला कुलूप लावून हे आंदोलन केले.
राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या निर्णयाविरोधात २०२२पर्यंत मुदत असतानादेखील शेतकऱ्यांकडून सक्तीने थकीत वीजबिल वसूल करणाऱ्या महावितरण कंपनीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वीच आमदार किशोर पाटील यांनी दिला होता. शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीची वसुली २०२२पर्यंत करावी, असे निर्देश असतानाही ऐन मे महिन्यात मशागतीचे आणि लागवडीच्या दिवसात सक्तीने थकबाकीची वसुली करणे अन्यायकारक आहे. विजेची कुठलीही समस्या निर्माण झाल्यास, ट्रान्सफार्मर- केबल जळाल्यास महावितरण कंपनी सक्तीने शेतकऱ्यांकडून वसुली करत आहे.
शेतकरी कोरोना संकटात आधीच हवालदील झाला असताना अंदाजे बिल आकारून थकबाकी असलेल्या एकाच ट्रान्सफार्मरवर असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे हे अन्यायकारक असल्याचे सांगताना आमदार किशोर पाटील यांनी पुढील आंदोलन जिल्हास्तरावर छेडण्यात येणार असून कुठलीही पूर्वसूचना न देता असे आंदोलन छेडले जाईल, असा इशारादेखील यावेळी दिला.
पाचोरा तालुक्यातील विरोधी पक्ष अतिशय निष्क्रिय असल्यामुळे जरी सत्तेत असलो, तरी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे सांगताना शिवसेना - भाजप युतीच्या काळात भडगाव तालुक्यातील कोठली येथील १३२ केव्ही उपकेंद्राच्या निर्मितीसाठीदेखील आंदोलन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पोलिसांनी आमदार किशोर पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे यांच्यासह पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला.
===Photopath===
070621\07jal_1_07062021_12.jpg
===Caption===
आमदार किशोर पाटील यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे