दूध दर घसरले! खडसेंच्या काळात तोट्यात गेलेला दूध संघ नफ्यात आल्याचा आमदार मंगेश चव्हाणांचा दावा
By विजय.सैतवाल | Published: December 2, 2023 07:46 PM2023-12-02T19:46:20+5:302023-12-02T19:48:22+5:30
दूध दराविषयी माहिती देण्यासाठी शनिवार, २ डिसेंबर रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
जळगाव : राज्यभरात पशुपालक शेतकऱ्यांना दुधाचे दर अत्यंत कमी मिळत असून, ते परवडणारे नसल्याने त्यांना भावातील फरक भरुन काढण्यासाठी अनुदान देण्याची मागणी राज्य शासनाकडे करणार आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन तथा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. दूध दराविषयी माहिती देण्यासाठी शनिवार, २ डिसेंबर रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संचालक रोहित निकम, कार्यकारी संचालक शैलेश मोरखेडे उपस्थित होते. संपूर्ण राज्यातच नैसर्गिक परिस्थितीमुळे दुधाचे दर कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जळगावात देखील शेतकऱ्यांना दूध संघ ३४.६० रुपये दर देत होता, आता हेच दर ३०.६० रुपये दिले जात आहे. हे दर परवडणरे नसल्याने दूध संघ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फरक म्हणून ५० पैसे देण्याच्या विचारात आहे. तसेच राज्यातील दुग्ध व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे देखील लिटरमागे २ रुपयांचे अनुदान देण्याची मागणी करणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. जळगाव जिल्हा दूध संघ शेतकऱ्यांना देत असलेले दर राज्यातील इतर मोठ्या दूध संघांपेक्षा जास्त असल्याचा दावा त्यांनी केला.
खडसेंच्या काळात तोटा, आता नफा
राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दूध संघातील कामावरून केलेल्या टीकेलाही आमदार चव्हाण यांनी उत्तर दिले. खडसे दूध संघात असताना आठ महिन्यांत सुमारे ९ कोटी ६० लाख रुपये तोटा झाला होता. तो भरण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून, आम्ही सत्तेत आल्यापासून दूध संघाला दर महिन्याला नफा झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांचा नव्हे खडसेंचाच आक्रोश
एकनाथ खडसे यांनी जिल्हा बँक, दूध संघ तसेच गौण खनिज उत्खननात मोठा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष करावे यासाठी खडसेंनी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला. मात्र, त्यातला जो आक्रोश होता, शेतकऱ्यांच्या नव्हे तर यातून वाचण्यासाठी एकनाथ खडसेंचा होता, अशा खोचक शब्दात मंगेश चव्हाण यांनी खडसेंवर टीका केली.
लेखापरीक्षण अहवालात मोठा ठपका
एकनाथ खडसे यांच्या कार्यकाळात जिल्हा दूध संघात दूध, पावडर, लोणी यामध्ये गैरव्यवहार झाले. त्यांनी अनेकांची फसवणूक केली असून, त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. संगनमताने अपहार झाला असून, लेखापरीक्षणात मोठा ठपका ठेवण्यात आल्याचा दावा मंगेश चव्हाण यांनी केला.