डाळ चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी वावरला आमदाराचा 'पीए' म्हणून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 10:09 AM2020-02-25T10:09:54+5:302020-02-25T10:11:44+5:30
मुलाच्या भेटीसाठी आला अन् कोठडीत गेला
जळगाव : डाळ चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गोकूळ हंसराज राठोड याचा काही वर्षापूर्वी तत्कालिन आमदारांसोबत सतत वावर होता व तो त्यांच्यासोबत मंत्रालय आणि महत्वाच्या सरकारी कार्यालयात त्यांचा स्वीय सहायक म्हणूनही वावरत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, गुन्ह्यात अडकल्यानंतर भविष्यात पोलिसांनी आपल्याला त्रास देऊ नये किंवा कारवाई होऊ नये यासाठी पोलिसांच्याच खोट्या लेखी तक्रारी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करायचा. त्याच्या या तक्रारीपासून अनेक पोलिसांना त्रासही झालेला आहे.
गोकूळ हा सराईत गुन्हेगार असून डाळ चोरीच्या दोन गुन्ह्यात तो फरार होता. एमआयडीसीतील डाळ मीलमधून त्याने डाळीचे कट्टे लांबविले आहेत, अनेक ठिकाणी तर तो सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झालेला आहे. दरम्यान, जेथे डाळ चोरी शक्य नाही, तेथे तो वॉचमनच्या मदतीने हे काम करायचा, असेही तपासात उघड झाले आहे.
गोकूळ हा २० वर्षापूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघातील एका आमदाराच्या संपर्कात आला होता. या आमदारांचे आणि त्याचे घनिष्ट संबंध प्रस्थापित झाले होते. मुंबईत मंत्रालय असो की नागपूर विधीमंडळ आमदारांच्यासोबतच तो रहायचा. त्यांनी सांगितलेली कामे तो इमानेइतबारे करायचा. एक प्रकारे तो स्वीय सहायकासारखाच वावरत होता. हा आमदार ज्या पक्षाचा होता, त्याच पक्षाचे सरकार होते, त्याशिवाय आमदाराचाही सरकारमध्ये दबदबा होता. त्यामुळे अधिकारीही त्याला स्वीय सहायकच समजायचे, प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते.
मुलाच्या भेटीसाठी आला अन् कोठडीत गेला
एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात गोकूळचा मुलगा आरोपी आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी सहायक फौजदार अतुल वंजारी, गोविंदा पाटील, मुदस्सर काझी, सतीश गर्जे व इम्रान सय्यद यांचे पथक नेमले असताना रविवारी गोकूळ याच्या मुलाचा शोध घेत असतानाच तो पथकाच्या हाती लागला. इकडे मुलाच्या भेटीसाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सोमवारी त्याची कारागृहात रवानगी झाली.