आमदार पाटील मानेच्या आजाराने त्रस्त, तर माजी मंत्री खडसे विलगीकरण कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 03:39 PM2021-01-03T15:39:17+5:302021-01-03T16:35:32+5:30
ग्रामपंचायत निवडणूक शिलेदार आणि कार्यकर्त्यांच्या भरवशावर सोपवली असल्याचे मुक्ताईनगर तालुक्यातील चित्र आहे.
विनायक वाडेकर
मुक्ताईनगर, जि.जळगाव : गेल्या दीड महिन्यापासून आमदार चंद्रकांत पाटील हे मानेच्या आजाराने त्रस्त असूनल मुंबई येथे उपचार घेत आहेत. त्यातच माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक शिलेदार आणि कार्यकर्त्यांच्या भरवशावर सोपवली असल्याचे मुक्ताईनगर तालुक्यातील चित्र आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. ४ जानेवारी रोजी माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. माजी मंत्री खडसे यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तालुक्याची राजकीय परिस्थिती काही प्रमाणात विचित्र अवस्थेत पोहोचलेली आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत व महाविकास आघाडीचे आमदार विद्यमान ठाकरे सरकारमध्ये आहेत. त्यातच खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तेही महाविकास आघाडीचा घटक झाले आहेत. परंतु मुक्ताईनगर तालुक्यात खडसे व पाटील यांच्यातील वाद हे सर्वश्रुत असून "दोघांमधून विस्तव जात नाही" अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांशी कार्यकर्ते व नेते हे दोन्ही नेत्यांकडे कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत असल्याने मतदारांमध्येदेखील संभ्रम निर्माण झाला आहे.
नेत्यांच्या अनुपस्थितीत शिलेदार लढवताय किल्ला
आमदार पाटील यांच्या मानेवर येत्या ६ जानेवारी रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. खडसे कोरोनामुळे मुंबईत विलगीकरण कक्षात आहेत. तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीची निवडणूक खऱ्या अर्थाने दुसऱ्या फळीतील शिलेदारांवर येऊन पोहोचलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खडसे यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे खेवलकर ग्रामपंचायत निवडणुकीचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील सातत्याने पाठीशी उभे राहत आहेत. तालुक्यातील चारही गटातील निवडणुकांची जबाबदारी गट व गण प्रमुखांकडे सोपविण्यात आली आहे. त्यात विशेषतः माजी गटनेते विनोद तराळ, पंचायत समिती सदस्य किशोर चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, योगेश कोलते, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. पवन पाटील, पूर्णाडचे संदीपराव देशमुख, ईश्वर राहणे, आनंदराव देशमुख, ताहेरखान पठाण, दशरथ कांडेलकर, डॉ. बी सी महाजन, माणिकराव पाटील, अतुल पाटील, विकास पाटील, राजेंद्र माळी, माजी सभापती विलास धायडे यासारख्या युवा नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहे.
शिवसेनेतर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांचा कल शक्यतो ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी जेणेकरून गावातील भा बंदकीतील वाद होऊ नये हा मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. असे असले तरी ज्या ठिकाणी निवडणूक होईल तेथील जबाबदारी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख अफसरखान, प्रफुल्ल पाटील, महेंद्र मोंधाळे, नगरसेवक संतोष मराठे, राजेंद्र हिवराळे, वसंत भलेभले यांच्यासह ग्रामीण भागातील नवनीत पाटील, पंकज पांडव, सूर्यकांत पाटील, बाळू पाटील, नारायण पाटील, सुधीर कुलकर्णी, डी.आर.महाजन, मोहन बेलदार, नीलेश पाटील, दिलीप चोपडे, नीतेश पाटील, ईश्वर पाटील, योगेश पाटील, चंद्रकांत बढे, राजू कांडेलकर, मगन राठोड, जीवराम कोळी, पंकज कोळी, संदीप ढगे, सोपान तायडे, शिवाजी पाटील, उमेश पाटील, शेषराव कांडेलकर, नरेंद्र गावंडे यासारख्या प्रमुख गट व गणनिहाय पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
वायला ग्रा.पं.मधून सेनेने उघडले खाते
तालुक्यातील वायला येथील ग्रापंचायतीचे पाचही उमेदवार बिनविरोध निवडून आणत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. वायला ग्रामपंचायतीच कायापालट करणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.