आमदार शिरीष चौधरींचे भाजपकडून उमेदवारीचे प्रयत्न अन्यथा बसपाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:22 AM2019-03-31T11:22:32+5:302019-03-31T11:23:12+5:30
दोघांचा वाद तिसऱ्याचा फायदा
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून निवडणूक लढविण्याचे आपले प्रयत्न आहेत. ए.टी. पाटील व स्मिता वाघ यांच्या भांडणात आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्याशी संवाद साधला असल्याची माहिती अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. भाजपने संधी न दिल्यास बसपाला प्राधान्य असेल असेही ते म्हणाले.
भाजपकडून जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आल्याने विद्यमान खासदार ए.टी. पाटील हे नाराज आहेत. त्यांनी जिल्हाध्यक्ष व जलसंपदा मंत्री यांच्याबद्दल नाराजीही व्यक्त केली असून आपल्यालाच उमेदवारी मिळावी असे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
दोघांचा वाद तिसऱ्याचा फायदा
भाजपातील दोघा नेत्यांमधील वादाची परिस्थिती लक्षात घेऊन अमळनेर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत दोघांच्या भांडणात आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी अद्याप निर्णय दिला नसल्याचेही ते म्हणाले.
निवडणूक लढविणारच
लोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर आपण ठाम असून भाजपाने संधी न दिल्यास बसपाकडून निवडणूक लढवू असे ते म्हणाले. तसेही न झाल्यास अपक्ष उमेदवारी असेल असेही चौधरी यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज नेला
लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्जही नेला. सोमवार किंवा मंगळवारी आपण उमेदवारी अर्ज दाखल करू, असे त्यांनी सांगितले.