आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:55+5:302021-06-27T04:12:55+5:30
एरंडोल : येथे म्हसावद रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम जवळपास तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू असल्यामुळे वाहनचालक जाम वैतागले आहेत. पंधरा दिवस ...
एरंडोल : येथे म्हसावद रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम जवळपास तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू असल्यामुळे वाहनचालक जाम वैतागले आहेत. पंधरा दिवस काम करून सहा महिने काम बंद ठेवल्यामुळे वाहनचालकासह प्रवाशांचे हाल होत आहेत. आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे वाहनचालकांनी तक्रारी केल्यामुळे आमदारांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना धारेवर धरले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजपूत यांना आमदार चिमणराव पाटील यांनी खडेबोल सुनावले.
आतातरी झोपेचे सोंग सोडा. जनतेच्या हिताची कामे करा; अन्यथा घरी बसा, अशा शब्दात आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
मागील आठवड्यात म्हसावदनाका परिसरात संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी ठेकेदाराशी संपर्क केला असता २१ जूनपासून काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. २५ जून रोजी आमदार चिमणराव पाटील यांनी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून कामाची पाहणी केली.
काही विद्युतपोल अडचणीचे ठरत असल्यामुळे काम रखडले आहे, असे सांगण्यात आले. पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ती अडचण दूर करण्याबाबत सूचना केली. काँक्रिटीकरणाचे काम सोमवारपासून सलग करण्याची ग्वाही देण्यात आली.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, शालिग्राम गायकवाड, चंद्रसिंग जोहरी, चिंतामण पाटील, अतुल महाजन आदी उपस्थित होते.