आमदार, आयुक्त वर्कऑर्डर द्या, नाही तर राजीनामा द्या! मेहरुणमधील महिलांचा मनपात ठिय्या
By सुनील पाटील | Published: October 23, 2023 07:57 PM2023-10-23T19:57:41+5:302023-10-23T19:57:57+5:30
मेहरुणमधील वॉर्ड क्र.१४ चा गट क्र.२५१ मधील रस्त्याच्या कामाच्या वर्कऑर्डरसाठी महिलांनी सोमवारी थेट महापालिकेत येऊन प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला.
जळगाव : मेहरुणमधील वॉर्ड क्र.१४ चा गट क्र.२५१ मधील रस्त्याच्या कामाच्या वर्कऑर्डरसाठी महिलांनी सोमवारी थेट महापालिकेत येऊन प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. आमदार महोदय उद्घाटन केले, पण कार्यादेश थांबले...राजीनामा द्या...आयुक्त मॅडम प्रशासक झालात, मग लोकांना वेठीस का धरतात..वर्कऑर्डर द्या नाही तर राजीनाम द्या असे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. दोन तासाच्या आंदोलन केल्यानंतरही आयुक्त न आल्याने महिला माघारी फिरल्या.
मेहरुणमधील गट क्र.२५१ मधील रस्त्याच्या कामासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग अशा दोघांनी निविदा प्रक्रिया राबवली आहे. २०२२ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. बांधकाम विभागाच्या कामांना सहा महिन्यापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. शेजारील गट क्र.२५० मध्ये कामाची वर्कऑर्डर देण्यात आली, मात्र २५१ मधील कामाची वर्कऑर्डर आमदार सुरेश भोळे यांच्या दबावामुळे दिली जात नसल्याचा आरोप महिलांनी केला. मध्यंतरी आमदारांनी या कामाचे उदघाटनही केले होते. याच कामावरुन भाजप व शिंदे गट समोरासमोर आले आहे. मक्तेदार सूरज नारखेडे यांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. आता सोमवारी महिलांनी वर्कऑर्डरसाठी महापालिकेत धडक दिली. साडे तीन ते साडे पाच असे दोन तास आंदोलन केले, मात्र आयुक्त कार्यालयात न आल्याने महिला माघारी फिरल्या. आमदार व आयुक्तांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.