शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकासाठी आमदारांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:47 PM2017-12-06T16:47:18+5:302017-12-06T16:52:55+5:30
हिंगोणे येथील गावात जावून आमदार हरिभाऊ जावळे यांनी केली जागेची पाहणी
आॅनलाईन लोकमत
हिंगोणे,ता.यावल,दि.६ : २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्यातील शहीद व येथील रहिवासी मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या स्मारकाची हिंगोणे गावात लवकरच उभारणी होणार आहे. त्यासाठी आमदार हरिभाऊ जावळे यांनी पुढाकार घेतला असून बुधवारी जागेची पाहणी केली.
शहीद मुरलीधर चौधरी यांच्या ‘स्मारकाची नऊ वर्षानंतरही प्रतीक्षा’ असे वृत्त ‘लोकमत’ ने २६ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन आमदार हरीभाऊ जावळे यांनी ६ डिसेंबर रोजी येथे अधिकाºयांसोबत स्मारकाच्या जागेची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी ग्रा.पं.कार्यालयात अधिकारी, पदाधिकारी यांची बैठक घेतली. यात त्यांनी शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकाची लवकरच उभारणी केली जाईल, असे सांगितले. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत ब्रम्हनंद तायडे यांच्याशी चर्चा केली. स्मारकासाठी अंदाजपत्र तयार करुन ते वरिष्ठ स्तरावर पाठविण्याच्या सूचना केली. आमदार व अन्य निधीतून स्मारक उभारण्याचा त्यांनी निश्चय केला.
आमदार जावळे यांनी ग्रामस्थांना स्मारकासाठी निधी गोळा करण्याची गरज नाही, असे सांगितले. स्मारकासाठीचा निधी उपलब्ध करुन देईल. पैशांचा विचार न करता स्मारकाच्या कामाला लागा. दोन महिन्यात स्मारक उभे करण्याचा त्यांनी व ग्रामस्थांनी संकल्प केला. प्रसंगी सरपंच नवलसिंग लोंढे, ग्रामविकास अधिकारी सी.आर.सपकाळे, सागर महाजन, भरत पाटील, बाळू कुरकुरे उपस्थित होते.