महिनाभरापूर्वी कार्यादेश दिल्यावरही जळगावात आमदारांनी थांबविली मनपाची कामे - विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:06 PM2018-09-27T13:06:23+5:302018-09-27T13:07:07+5:30
महापौरांच्या हस्ते उद्घाटनासाठी आमदारांचा खटाटोप
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर विकासासाठी मनपाला दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून कामांचा शुभारंभ शुक्रवारपासून होणार आहे. मात्र, या कामांसाठी मनपाने २४ आॅगस्ट रोजी मक्तेदाराला कार्यादेश दिले असताना देखील आमदार सुरेश भोळे यांनी मनपा प्रशासन व मक्तेदारावर दबाव आणून कामे थांबवली असल्याचा धक्कादायक आरोप मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला आहे.
बुधवारी शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश सोनवणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी निलेश पाटील हे उपस्थित होते. सुनील महाजन म्हणाले की, २५ कोटी रुपयांचा निधी आणण्यासाठी खाविआने प्रयत्न केले होते.
तसेच या निधीतून होणाऱ्या सर्व कामांचे नियोजन देखील खाविआच्या काळातच झाले.
मात्र, महापौर व उपमहापौर निवडीनंतरच या कामांचा शुभारंभ करू न जळगावकरांसमोर मोठा ‘इव्हेंट’ करून या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदार भोळेंचा असल्याचा आरोप सुनील महाजन यांनी केला.
आमदारांनी १०० कोटीचे श्रेय घ्यावे
२५ कोटीचा निधी हा खाविआनेच आणला आहे. तसेच शहरविकासासाठीच हा निधी आणला आहे. मात्र,आमदारांनी या निधीबाबत केवळ श्रेयवादाचे राजकारण केले. आमदारांनी २५ कोटी पेक्षा जो १०० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्या निधीचे श्रेय घेवूनत्यांनी शहरातील कामे मार्गी लावावेत असा सल्ला देखील महाजन यांनी आमदार भोळे यांना दिला आहे.
ज्या नगरसेवकांनी २५ कोटी रुपयांच्या कामांसाठी मेहनत घेतली, त्यांना तरी आमदारांनी विश्वासात घ्यायला हवे होते असेही महाजन यांनी सांगितले.
मक्तेदार, मनपा अभियंतांवर टाकला दबाव !
मनपाने २५ कोटीपैकी १३ कोटी रुपयांच्या कामांसाठी २४ आॅगस्ट रोजी कार्यादेश दिले होते. त्यानुसार मक्तेदारांकडून या कामांना सुरुवात देखील केली जाणार होती. मात्र, या कामांना सुरुवात ही महापौर व उपमहापौर निवडीनंतरच व्हावी अशी इच्छाआमदार भोळेंची होती. तसेचआम्ही सत्तेवर आल्यानंतर या कामांना सुरुवात केली हा देखावा आमदारांना करवयाचा होता. त्यामुळेच आमदारांनी हा खटाटोपसुरु केला असल्याचा आरोप देखील सुनील महाजन यांनी केला आहे. आमदारांनी श्रेय मिळविण्यासाठी महिनाभर विकासात्मक कामांना ब्रेक लावली आहे. तसेच मक्तेदारावर कामे सुरु करू नका यासाठी देखील दबाव टाकला असल्याचा आरोप महाजन यांनी केला.
शिवसेना नगरसेवकांना अजुनही पराभव पचनी पडताना दिसून येत नाही. त्यांनी कामे केले नाहीत म्हणून जळगावकरांनी त्यांना उत्तर दिले आहे. त्यांच्या आरोपांवर उत्तर देण्यास मला स्वारस्य नसून, आम्ही या पाच वर्षात शहराचा सर्वांगिण विकास करून कामांद्वारे त्यांच्या आरोपांना उत्तर देवू.
-सुरेश भोळे, आमदार