कोरोना संकटात मनरेगाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:30 AM2021-02-28T04:30:37+5:302021-02-28T04:30:37+5:30
जळगाव : कोरोनाचे संकट ओढावले आणि अनेकांचे हातचे काम गेलेले असताना या संकटात मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांचा मोठा आधार ...
जळगाव : कोरोनाचे संकट ओढावले आणि अनेकांचे हातचे काम गेलेले असताना या संकटात मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांचा मोठा आधार जिल्ह्यातील मजुरांना मिळाला असून अनेक कामे गावातच होत असल्याने त्याचा स्थानिकांना मोठा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे दरवर्षाच्या तुलनेत लाॅकडाऊनच्या काळात मजुरांची संख्या वाढली असून ती जवळपास दुप्पट झाली आहे. सध्या शेतीची कामे संपल्याने यात आणखी भर पडत असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला व जिल्ह्यासह राज्यात, देशात लॉकडाऊन जाहीर झाले. या लॉकडाऊनच्या काळात उद्योग, व्यापार बंद झाला, किरकोळ व्यवहार थांबले. शेतीच्या कामावरही त्याचा परिणाम झाला. अशा परिस्थितीत तर जे रोजंदारी, हातमजुरी करणारे आहेत, त्यांच्यावर तर मोठे संकट ओढावले. मात्र अशा काळात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा त्यांना मोठा आधार मिळाला.
मार्च महिन्यापासून वाढती संख्या
गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाले आणि त्यानंतर रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची तसेच कामांचीही संख्या वाढतच गेली. मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या काळातील मजुरांची संख्या पाहता ही सरासरी आठ हजारापर्यंत राहिली असल्याचे चित्र आहे. मजुरांची संख्या कमी-जास्त होत असताना ती सहा हजाराच्या खाली आली नाही व १० हजाराच्या पुढे गेली नाही. एरव्ही दरवर्षी मजुरांच्या संख्येची सरासरी पाहता ती चार हजार असते. मात्र लॉकडाऊन काळात ही सरासरी दुप्पटवर पोहचली आहे.
मागेल त्याला काम उपलब्ध
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी सप्टेंबर २०२०पासून कोरोनाचा संसर्ग कमी-कमी होत गेल्यानंतर ऑक्टोबर २०२० व जानेवारी २०२१ या महिन्यातील तुलना पाहता जानेवारीपर्यंत ही संख्या वाढलेलीच आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये सरासरी आठ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले होते. त्यानंतर आता जानेवारी २०२१मध्ये आठ हजार १०० मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. सध्या शेतीचा हंगाम संपल्याने मजूर इकडे वळत असल्याने ही संख्या वाढत असून मागेल त्याला काम उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.
फळबाग लागवड, कुंपन भिंतीचा आधार
मजुरांची संख्या वाढण्यासह कामांचीही संख्या वाढली आहे. दरवर्षी घरकूल, गोठे, फळ बाग लागवड अशा विविध कामांचा मजुरांना आधार होतो. या वर्षी ही कामे होत असताना शाळेच्या कुंपन भिंतीचेही कामे झाली. यातून गावातील मजुरांना गावातच काम मिळाल्याने त्याचा मोठा आधारही त्यांना झाला. या सोबतच सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शेती बांध, शेतात फळ लागवड करण्याचे काम मिळाल्याने त्याचा २०० लाभार्थ्यांना आधार झाला. या योजनेत तब्बल ११०० रोपांची लागवड झाली. या सोबतच शाळेच्या ६०० कुंपनभिंती, १२ हजार घरकूल अशी विविध कामे होऊन लॉकडाऊनमध्ये मजुरांना मदत झाली.