भुसावळ येथे पोलिसांच्या दक्षतेमुळे महिलेला मिळाला हरविलेला मोबाइल व पर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 05:04 PM2018-12-02T17:04:26+5:302018-12-02T17:08:55+5:30
भुसावळ तालुक्यातील खडका गावातील अनिल वारके यांची आई भुसावळला बाजार करण्यासाठी आली असता त्या महिलेचा मोबाइल व पर्स हरविल्याची घटना सकाळी घडली. यानंतर पोलीस कर्मचारी तस्लीम पठाण यांच्या जागरुकतेमुळे ते संबंधितांना परत मिळाले.
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील खडका गावातील अनिल वारके यांची आई भुसावळला बाजार करण्यासाठी आली असता त्या महिलेचा मोबाइल व पर्स हरविल्याची घटना सकाळी घडली. यानंतर पोलीस कर्मचारी तस्लीम पठाण यांच्या जागरुकतेमुळे ते संबंधितांना परत मिळाले.
रविवारचा बाजार भुसावळात भरत असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक बाजारासाठी येतात. यामुळे बाजारात चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे. मोबाइल चोरीचे सत्र हे दर रविवारी सुरूच असते. कित्येकांचे मोबाइल चोरीला जातात. या चोरट्यांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. ही मुले इतक्या हुशारीने बाजारात येणाऱ्याचा मोबाइल चोरी करतात की त्यांना आपला मोबाइल चोरी झाल्याचा पत्ताही लागत नाही. काही वेळेनंतर माहिती पडते की, आपला मोबाइल चोरी झाला आहे. अशा या गर्दीमध्ये खडका गावातील अनिल वारके यांच्या आईचा मोबाइल व पर्स हरविली. यामुळे त्यांच्याजवळ पैसे नव्हते. तसेच गाव दूर असल्यामुळे त्यांची बाजार करण्यासाठी धावपळ झाली.
पर्स व मोबाइल हरविल्यामुळे कोणाला पर्स दिसली का असे लोकांना विचारीत असल्यामुळे ही माहिती परिसरात पसरली. आठवडे बाजारात पोलीस बंदोबस्त करीत असलेले ए.एस.आय. तस्लीम पठाण यांना ती हरविलेली पर्स व मोबाइल मिळाल्याने त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. मोबाइलमधील नंबर लावून तो मोबाइल कोणाचा आहे याची खात्री करून अनिल वारके याचा असल्याची माहिती मिळाल्याने त्याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला बोलवले.
पोलीस कर्मचारी व पत्रकार नीलेश के. फिरके यांच्यासमक्ष १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल व रोख २११० रुपये रोख पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. पठाण यांनी वारके यांच्या ताब्यात मोबाइल व पर्स दिली. यामुळे वारके सोबत आलेले पाच ते सहा मुलांनी तस्लिम पठाणचे आभार मानले.