मोबाईल कॉलने झाला ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 02:23 AM2020-08-11T02:23:49+5:302020-08-11T02:24:23+5:30
धुळ्याच्या तरुणाला जळगावातून अटक : पारोळ्यात महामार्गावर झाला होता खून
जळगाव : ट्रक चालकाच्या मोबाईलवरुन धुळ्यात आई, वडिलांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या मित्राला फोन केला अन् तिथेच घात झाला. त्याच कॉलच्या माध्यमातून पोलिसांनी पारोळा येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा केला. दोन दिवसातच शाकीर शहा अदमान शहा (२६, मुळ रा.धुळे ह.मु.रा.तांबापुरा, जळगाव) याचा शोध घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले. दरम्यान, मारेकरी निष्पन्न होऊन अटक झालेला असला तरी खुनाचे मूळ कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
पारोळाजवळ महामार्गाच्या नजीक करंजी शिवारात ८ आॅगस्टच्या पहाटे द्वारका मुखराम यादव (५०, रा.जऊळके, ता.दिंडोरी, जि.नाशिक) या ट्रक चालकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. मृतदेहापासून काही अंतरावर रक्ताने माखलेला चाकू आढळून आल्याने यादव यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते.
यादव हे ७ आॅगस्ट रोजी डाळ घेऊन ट्रकने (एम.एच.१५ इ.जी. ५६७१) जळगाव व पारोळ्यासाठी निघाले होते.
दोघं ठिकाणी डाळ पोहचविल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी जळगाव एमआयडीसीतील ओम इंडस्ट्रीजमधून डाळीचे १२५ कट्टे घेऊन नाशिकसाठी परत निघाले होते. यावेळी ते ट्रक मालक तानाजी खंडेराव जोंधळे (४०, रा.जऊळके,ता. दिंडोरी, जि.नाशिक) यांच्या संपर्कात सायंकाळपर्यंत होते, मात्र नंतर त्यांचा संपर्कच बंद झाला होता.
त्यामुळे मालक जोंधळे हे त्यांच्या शोधार्थ आले असता ८ आॅगस्ट रोजी पहाटे महामार्गाच्या लगत अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची माहिती मिळाली.
घटनास्थळावर पाहणी केल्यावर ती व्यक्ती द्वारका यादव असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र घटनास्थळावर ट्रक व डाळ नव्हती. जोंधळे यांच्या फिर्यादीवरुन पारोळा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
घटना उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी तातडीने अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, सहायक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना घटनास्थळावर रवाना केले. या गुन्ह्याच्या तपासासाठी पारोळा व स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथके तयार केली. चौकशीत त्याच दिवशी ट्रक चालकाचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला. त्यावर आलेले व झालेले कॉल तपासले असता त्यात शेवटचा कॉल धुळे येथे झालेला होता. त्या व्यक्तीची चौकशी केली असता तो खामगाव येथे होता. जळगावात आल्यावर कौशल्याने पोलिसांनी त्याचे वाहन अडविले व तेथे चौकशीत हा कॉल शाकीर शहा याने केल्याचे उघड झाले. पोलिसांनी रविवारी सायंकाळी सासरवाडी असलेल्या तांबापुरातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने प्रारंभी ह्यमी नाही त्यातलाह्ण ची भूमिका घेतली, मात्र पोलीस खाक्याचा हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
*डाळ व ट्रक लांबविण्याच्या उद्देशानेच खून झाल्याचा संशय*
पोलिसांच्या चौकशीत शाकीर शहा याने आपण जळगाव येथून ट्रकमध्ये बसले. गाडीत चालकाशी वाद झाल्याने त्यातून त्याचा खून झाल्याचे सांगितले, मात्र शाकीर याचा इतिहास पाहता त्याच्याविरुध्द यापूर्वी धुळ्यात गुन्हे दाखल आहेत. डाळ व ट्रक चोरीच्या उद्देशानेच त्याने हा खून केल्याचा संशय आहे. पोलिसांनी हा ट्रक धुळे येथून ताब्यात घेतला. या गुन्ह्यात आरोपीजवळ मोबाईल नव्हता तसेच कोणताही पुरावा किंवा साक्षीदार नसताना पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.