वाहन चालवितांना मोबाईल काॅल म्हणजे यमराजाला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:38+5:302021-01-01T04:11:38+5:30
जळगाव : दुचाकी, चार चाकी वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या ...
जळगाव : दुचाकी, चार चाकी वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नये आणि जर अति आवश्यक फोन असेल तर वाहन थांबवून बोलावे. पण तरीही मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.
जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाहन चालवित असताना मोबाईलवर बाेलणा-या २ हजार ४७० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनधारकांकडून एकूण ४ लाख ९४ हजार ४०० रूपयांचा दंडही पोलिसांनी वसूल केला आहे. मागील वर्षी १ हजार ३५२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन चालविताना मोबाईलवर बोलणा-यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.
दरम्यान, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उजव्या हातात गाडीचे हॅण्डल आणि डाव्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. तर काही गाडी चालवित असताना संदेश वाचत असतात. मोबाइलवर बोलणे आणि वाहन चालविणे या दोन्ही क्रिया सोबत असतील तर सहाजिकच मोबाइलवर बोलण्याकडे चालकाचे अधिक लक्ष जाते. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात होऊ शकतो. त्यामुळे अशांना पकडण्याची विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच मोबाइल जप्त केले तर अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे.
२०० रू. दंड
वाहन चालवताना मोबाइलवर बोलताना पोलिसांनी पकडल्यास २०० रुपये दंड आकारला जातो. ही दंडाची रक्कम कमी असल्याने अनेकदा वाहनचालक मोबाइलवर बोलताना आढळून येतात. मात्र चिरीमिरी देऊन त्यांना सोडून दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारवाईची भीती कमी झाली असल्याचे दिसून येते.
मागील वर्षी जिल्ह्यात वाहतूक पोलिसांकडून १ हजार ३५२ मोबाईलवर बोलवणा-या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ७० हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावर्षी मोबाईलवर बोलणार्यांची संख्या वाढली आहे. अकरा महिन्यात तब्बल २ हजार ४७० वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आली. काही वाहनधारकांचे लायसेन्स देखील निलंबित करण्यात आले आहे.