बँक अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोबाइल सापडला जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:14 AM2021-05-31T04:14:04+5:302021-05-31T04:14:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रवासी झोपला असल्याचे पाहून मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला बँक अधिकाऱ्याने चोरी करताना रंगेहाथ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रवासी झोपला असल्याचे पाहून मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला बँक अधिकाऱ्याने चोरी करताना रंगेहाथ पकडून जळगाव जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले. शनिवारी पहाटे मुंबई-हावडा एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला असून, पोलिसांनी केलेल्या तपासात हा चोरटा चोरीच्याच तिकिटाने प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. अमरकुमार मुखिया, असे या चोरट्याचे नाव आहे.
रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथे स्टेट बँकेत व्यवस्थापक पदावर काम करणारे नीलेश गुप्ता हे गाडी क्रमांक (०२३२२) हावडा एक्स्प्रेसने शनिवारी रात्री मुंबई येथून कोडेरमा येथे जात होते. मुंबई येथून येताना पहाटे ३ वाजता या गाडीने मनमाड रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर अमरकुमार मुखिया (वय २०, रा. बिहार) हा तरुण बोगी क्रमांक बी-२ या डब्यात शिरला. याठिकाणी त्याने नीलेश गुप्ता यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. चार्जिंगला लावलेला मोबाइल हा उशालाच असल्याने गुप्ता यांना मोबाइल चोरी होत असल्याचा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी अमरकुमार मुखिया या चोरट्याला मोबाइल चोरताना रंगेहाथ पकडले. यानंतर त्यांनी लागलीच गाडीतील तिकीट निरीक्षकाला याबाबत माहिती दिली, तर त्या तिकीट निरीक्षकानेही तात्काळ जळगाव रेल्वे पोलिसांना माहिती देऊन, जीआरपीचे पोलीस अंमलदार एस.आर. पाटील व सचिन भावसार यांनी या चोरट्याला ताब्यात घेऊन, चोरीचा गुन्हा चाळीसगाव पोलिसांच्या हद्दीत घडला असल्याने, त्याला चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
इन्फो :
चोरट्याचा प्रवास चोरीच्या तिकिटावरच
पोलिसांनी केलेल्या तपासात या चोरट्याकडे असलेले तिकीट हे चोरीचेच असल्याचे आढळून आले, तर त्याच्याकडे असलेले तिकीट हे दुसऱ्या गाडीचे आढळून आले. त्यामुळे या चोरट्याने कुठल्या प्रवाशाचे तिकीट चोरले, तो हावडा एक्स्प्रेसमध्ये नेमका कुठल्या रेल्वे स्टेशनवरून चढला, याचा तपास लोहमार्ग पोलीस करत असल्याचे सचिन भावसार यांनी सांगितले.