आमदारांची मनोवृत्ती संकुचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2017 12:43 AM2017-03-18T00:43:25+5:302017-03-18T00:43:25+5:30
सुनील महाजन यांची टीका : २५ कोटींचे खरे श्रेय जलसंपदामंत्र्यांचे
जळगाव : शहरासाठी २५ कोटींचा निधी आणण्याचे श्रेय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे असून त्यासाठी महापौरांनी नियमितपणे पाठपुरावा केला आहे. आमदार सुरेश भोळे यांनी फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. याउलट आमदार भोळे यांची मनोवृत्ती संकुचित असून त्यांनी या निधीतील कामे ठरविण्यासाठीच्या समितीत मनपातील त्यांच्या विरोधी पक्षनेता अथवा गटनेत्याला सुद्धा स्थान न देऊन स्वपक्षाच्या सदस्यांवरच अविश्वास दर्शविला असल्याची टीका माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत केली.
महाजन यांनी सांगितले की, गेल्या २ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री जिल्हा दौºयावर आलेले असताना स्थानिक भाजपा नगरसेवकांसह तत्कालीन महापौरांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहरासाठी निधीची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटींचा निधी शहरासाठी देण्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून दीड दोन वर्षात आमदार सुरेश भोळे यांनी या निधीसाठी किती पाठपुरावा केला? हा संशोधनाचा विषय आहे. याउलट महापौरांनी मनपाचे जिल्हाधिकाºयांनी परस्पर वळते केलेले १० कोटी जलसंपदामंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करून परत आणले.
गेल्या १ वर्षापासून महापौरांनी मुंबईला मंत्रालयात जाऊन जलसंपदामंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तसेच वेळोवेळी आवश्यक ठराव, प्रस्ताव देऊन या २५ कोटींच्या निधीचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच आॅगस्ट २०१६ मध्ये शासनाने मनपाला पत्र देऊन अर्थसंकल्पात या २५ कोटींची तरतूद केल्याचे पत्र दिले.
...तर महत्त्वाचे प्रश्न सोडवा
आमदार भोळे यांना शहर विकासाचा खरच पुळका असेल तर त्यांनी शहरातील समांतर रस्ते, मार्केट गाळे करार, शिवाजीनगर व पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल आदी ज्वलंत प्रश्न सोडवावेत.
१८ मार्केटचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन तर आमदारांनी निवडणूक जाहीरनाम्यातच दिले होते. मात्र अडीच वर्ष उलटूनही हा प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. त्याचा पाठपुरावा त्यांनी करावा. न केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये. बजरंग बोगद्याच्या कामासाठीही आमदार, खासदारांनी कोणताही पत्रव्यवहार केला नाही.
मनपाने त्यासाठी पाठपुरावा केला. तसेच पावणेचार कोटींचा निधीही रेल्वेला दिला. मात्र त्याचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न आमदारांनी केल्याची टीका महाजन यांनी केली.
शासनाने शहर विकासाच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी दिला आहे. मात्र त्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला नाही. तर आमदार भोळे यांनी वारंवार केलेल्या तक्रारींमुळे ही समिती नेमली आहे. शहरातील कामे या निधीतून करावयाची असताना त्यात मनपाचा एकही प्रतिनिधी घेतलेला नाही.
आमच्यावर विश्वास नसेल तर समजू शकतो. मात्र भाजपाचे मनपातील विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक वामनराव खडके किंवा गटनेते सुनील माळी यांना तरी समितीत घ्यायला हवे होते.
मात्र आमदारांनी त्यांच्यावरही अविश्वास दाखविला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपाचे मिशन ५० प्लस ऐवजी मिशन १५ प्लस तर नाही ना? अशी शंका येते, अशी टीका त्यांनी केली.