मोदी आणि महाजनांचा करिष्मा पुन्हा चालेल...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:32 AM2019-03-20T11:32:35+5:302019-03-20T11:33:53+5:30
जामनेर तालुका वार्तापत्र
जामनेर : लोकसभा निवडणुकीची व संभाव्य उमेदवारांची चर्चा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करीत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल मतदारांची मानसिकता बदलवतील काय? पाच वर्षापूर्वी असलेली नरेंद्र मोदींची लाट यावेळी असेल काय? याचीच चर्चा तालुक्यातील मतदार करतांना दिसत आहेत. भाजपा शिवसेनेची युती झाली खरी, मात्र कार्यकर्त्यांच्या मनातील दुरावा काही कमी झालेला दिसत नाही. राष्ट्रवादी-काँंग्रेस आघाडीतही अद्याप शांतता आहे.
जामनेर मतदारसंघ लोकसभेच्या रावेर मतदार संघात येतो. हा मतदार संघ गेल्या २५ वर्र्षांपासून भाजपाकडे आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन याचे नेतृत्व करीत आहेत. ७० टक्के ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व आहे. जि.प.चे सहा गट व पं.स.चे १० गण भाजपाकडे आहेत. जामनेर व शेंदुर्णी नगरपंचायतवर देखील भाजपाचेच बहुमत आहे. २०१४ च्या निवडणुकीत तालुक्याने भाजपच्या रक्षा खडसे यांना ३९ हजार मतांची आघाडी दिली होती. मोदींची क्रेझ व महाजनांची मोहिनी मतदारांवर होती. खडसे खासदार झाल्यानंतर त्यांनी मतदार संघासाठी शासकीय निधीतील कामांव्यतीरिक्त पाचोरा- जामनेर या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासाठी पाठपुरावा केला. हा मार्ग जामनेरहून मलकापूरपर्यंत वाढविण्यासाठी सर्वेक्षण यावर्षी पूर्ण झाले ही जमेची बाजु म्हणावी लागेल. एक बुथ दहा युथ या पक्षीय कार्यक्रमांच्या निमित्ताने त्या मतदार संघात होत्या. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना तालुक्यात पहिल्या क्रमांकाची मते मिळाली होती.
जामनेर वराज्य व सहकारी संस्थांवर भाजपाचे वर्चस्व
जामनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट असुन त्यातील सहा भाजपकडे तर दोन राष्ट्रवादीकडे आहेत. पंचायत समितीचे एकुण १४ गण असुन दहा भाजपकडे तर ४ राष्ट्रवादीकडे आहे. सभापतीपद भाजपकडेच आहे.तालुक्यातील जामनेर नगरपालीका व शेंदुर्णी नगरपंचायत भाजपकडे आहेत.
जामनेर नगरपालिकेतील सर्व २४ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत. शेंदुर्णी नगरपंचायतीतील एकूण १७ पैकी १३ जागा भाजपकडे, ३ राष्ट्रवादी व एक काँग्रेसचा नगरसेवक आहे.
जामनेर बाजार समिती आणि शेतकी संघावर भाजपाचे सभापती तर शेंदुर्णी जीनप्रेस, शेंदुर्णी फ्रूटसेल आणि जामनेर जीनप्रेसवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.