मोहाडी येथील जि.प. शाळा डिजिटल करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून पाच एलईडी टीव्ही भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:59 PM2018-09-29T23:59:47+5:302018-09-30T00:01:41+5:30
शाळा डीजिटल करण्याचा प्रयत्न आदर्श
जळगाव : आपली शाळा डिजिटल होऊन त्याचा गावातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या हेतूने मोहाडी (ता.जामनेर) येथील जिल्हा परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल एक लाख ६७ हजार रुपयांची रक्कम जमा केली. माजी विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशविदेशात असलेल्या विद्यार्थ्यांनी देणगी देण्याचे जाहीर केले.
मोहाडी येथील रहिवाशी व जळगावातील सुवर्ण पेढीचे जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील व सोयगाव येथे प्राथमिक शिक्षक असलेले किरण वसंत पाटील यांनी गावातील माजी विद्यार्थ्यांचा माझा गाव माझी शाळा मोहाडी या नावाचा गृप तयार केला. या गृपमध्ये स्थानिक शिक्षकांनाही सहभागी करण्यात आले.
आज माजी विद्यार्थी नोकरी व्यवसायानिमित्त देश - विदेशात आहेत. गावातील जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्याची संकल्पना चर्चेतून पुढे आली. निधीचे सामूहिक आवाहन करण्यात आले. या संकल्पनेला साद देत ८० गृप सदस्यांनी १ लाख ६७ हजार रुपये निधी मनोहर पाटील यांच्या बँक खात्यात जमा केलेत. जमा रकमेतून शिक्षकांच्या मागणीनुसार ४३ इंची ५ स्मार्ट टीव्ही आणि उपयुक्त सामुग्रीची आॅनलाईन खरेदी करण्यात आली.
जळगाव जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जामनेरचे तहसीलदार नामदेव टिळेकर, यजुर्वेंद्र महाजन व जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांच्याहस्ते हे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात शाळेच्या शिक्षकांना देण्यात आले. या प्रसंगी या योजनेत सहभागी झालेले शाळेचे देणगीदार माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचा उत्फुर्त सहभाग असलेल्या या योजनेत कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही हे विशेष. प्रत्येकाने गाव आणि आपली शाळा या विषयाला प्राधान्य देत स्वत:चा सहभाग नोंदविला.
आपल्या गावातील शाळेला डिजिटलाईज करण्यासाठी मोहाडीतील ग्रामस्थांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. शाळेला केवळ संच भेट देवून न थांबता त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होईल याकडे लक्ष द्या. इतरही उपक्रम लोकांच्या सहभागात राबवा असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी येथे केले. उपस्थितांनीही मार्गदर्शन केले.
जयप्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक तर प्रा.ए.टी.पाटील यांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी प्रा.डी.टी. बागुल, प्रा.प्रदीप बागुल, प्रा.सिताराम साळुंखे, किरण पाटील, संभाजी पाटील, डॉ.अर्जुन चौधरी, सुनील अहीर, मनोज पाटील, मारुती ठाकरे, पद्माकर गुजर, विठ्ठल बागुल, संजय पाटील, रविंद्र पाटील, मंगलसिंग राजपूत, अतुल पाटील, परमेश्वर पाटील, वसंत ठाकरे, बादशाह पाटील, मनोहर पाटील, मुख्याध्यापक प्रकाश कुमावत यांच्यासह शाळेचे संपूर्ण शिक्षक हजर होते.