मोहाडीत तरुणाच्या डोक्यात घातली कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:35 PM2020-07-20T12:35:41+5:302020-07-20T12:35:44+5:30
सहा जणांवर गुन्हा : जखमीला औरंगाबादकडे
जळगाव : किराणा दुकानावर उधारीने साहित्य देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात गोविंदा गंगाराम गवळी (२८) या तरुणाच्या डोक्यात एकाने कुºहाडीने घाव घातल्याची घटना मोहाडी, ता.जळगाव येथे १६ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून गोविंदा याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला शनिवारी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता गोविंदा गवळी हा तरुण कामावरुन घरी जात असताना मोहाडी गावात मराठी शाळेच्या समोर आतेभाऊ विजय गवळी याच्या किराणा दुकानावर गर्दी दिसली म्हणून तेथे गेला असता दुकानावर उधारीने किराणा साहित्य देण्याच्या कारणावरुन त्याच्याशी गावातील काही जण वाद घालत होते.
हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना संतोष कोळी, विशाल कोळी, सागर कोळी, कृष्णा तायडे व गोपाल तायडे यांनी गोविंदा यालाच घेरुन लाथाबुक्यांनी मारहाण केली, त्याच वेळी शरद कोळी याने मागून येऊन गोविंदाच्या डोक्यात कुºहाडीने सपासप घाव घातले. यात गोविंदा याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होऊन बेशुध्द झाला.
नातेवाईकांनी त्याला तातडीने शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने शनिवारी त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले.
सर्व संशयित फरार
या घटनेप्रकरणी गोविंदा गवळी याच्या जबाबावरुन संतोष कोळी, विशाल कोळी, सागर कोळी, कृष्णा तायडे, गोपाल तायडे व शरद कोळी यांच्याविरुध्द प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांच्याकडून हा तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप कोणालाच अटक झालेली नाही, सर्व जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.