मोहन नगरात चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:53 PM2017-09-10T12:53:31+5:302017-09-10T12:56:28+5:30
महाबळ कॉलनी व मोहाडी रस्त्याला लागून असलेल्या मोहन नगरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरांची टेहाळणी करुन त्याच घरांना टार्गेट केले जात आहे
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१०,महाबळ कॉलनी व मोहाडी रस्त्याला लागून असलेल्या मोहन नगरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरांची टेहाळणी करुन त्याच घरांना टार्गेट केले जात आहे. महिनाभरात सात ते आठ घटना घडल्या आहेत. तक्रारदारालाच फिरविण्यात येत असल्याने अनेकांना पोलिसात तक्रार देण्याचे टाळले आहे.
गेल्या महिन्यात २४ आॅगस्ट रोजी आनंद नगरात स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला शोभा हिरामण पाटील यांच्या बंद घराचे टॉमीने कुलूप तोडून चोरट्यांनी आठ ते दहा हजार रुपयांची रोकड लांबविली होती.पाटील यांच्या घराशेजारीही एका बंद घराचे कुलूप तोडण्यात आले होते. त्यातील कोणतीही वस्तू चोरी झालेली नव्हती.
आता दोन दिवसापूर्वीही मोहन नगरात एका घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात चोरी केली आहे. घर मालक पुण्याला असल्याने हे घर बंद होते. घरात चोरी झाल्याचे समजल्याने रविवारी ते पुण्याहून घरी आले. तक्रार करुनही उपयोग नाही, उलट पोलीस ठाण्याच्या चकरा होतात असे म्हणत त्यांनी तक्रार देण्याचे टाळले आहे. या गल्लीत आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे.
गस्त वाढविण्याची अपेक्षा
आनंद नगर व मोहन नगर हा परिसर रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. शेजारी मोहाडी रोड, नेहरु नगर हा परिसर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या परिसरात गस्त होत नसल्याच्या तक्रारी आहेत.