मोकाट कुत्र्यांसाठीची भूतदया ठरतेय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:24 AM2021-02-23T04:24:00+5:302021-02-23T04:24:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत जात असून, महापालिका प्रशासनदेखील या विषयाकडे गांभिर्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत जात असून, महापालिका प्रशासनदेखील या विषयाकडे गांभिर्याने लक्ष द्यायला तयार नाही. तसेच अनेक नागरिकांची मोकाट कुत्र्यांबाबत असलेली भूतदया आता जळगावकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्राण्यांबद्दल प्रेम असावे मात्र हे प्रेम जर धोक्याची पातळी व मानवी जीवनालाच धोकेदायक ठरत असेल तर यावर उपाययोजना करण्याशिवाय पर्याय नाही. शहरातील चिकन, मटनचे स्टॉल, हॉटेल, हातगाड्या याठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत असून, ही कुत्री आता धोकेदायक ठरत आहेत.
शहरात गेल्या काही वर्षात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच अनेक भागात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. गेल्या महिन्यात शहरातील वाघ नगर भागात १४ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला होता. गेल्या वर्षभरात शहरात मोकाट कुत्र्यांनी ४०० हून अधिक नागरिकांना चावा घेतला आहे. महापालिका प्रशासनाला अजूनही या संदर्भात गांभीर्य नसून, शहरातील काही तथाकथित प्रेमींकडून शहरात राबविण्यात आलेल्या निर्बिजीकरणाच्या प्रक्रियेबाबत आक्षेप घेत हे काम थांबविले. निर्बिजीकरणाची प्रक्रिया थांबविल्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढणाऱ्या संख्येवर अंकुश लावणे कठीण झाले आहे. कारण मनपाने तब्बल ८ वेळा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर एक मक्तेदार मिळाला होता. मात्र, तक्रारीनंतर हे कामदेखील थांबले आहे.
हे रस्ते ठरू लागले आहेत हॉटस्पॉट
शिवाजीनगर परिसर,
एस.के.ऑईलमीलकडून कानळदाकडे जाणारा रस्ता, गेंदालाल मिल,ममुराबादकडे जाणारा रस्ता, वाघ नगर, निमखेडीकडे जाणारा जुना महामार्गाकडील रस्ता, भास्कर मार्केट परिसर, आसोदा रस्ता, रामानंदनगर रस्ता, पिंप्राळा रस्ता, सावखेडा रस्ता, मोहाडी रोड, घनकचरा प्रकल्पाकडे जाणारा रस्ता, चंदू अण्णा नगर हे सर्व परिसर मोकाट कुत्र्यांचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत.
निर्बिजीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही
शहरात वाढत जाणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा समस्येवर केवळ निर्बिजीकरणाचा एकमेव पर्याय आहे. मोकाट कुत्र्यांचा जीव घेणे हे मानवतेच्या दृष्टीने योग्य ठरू शकत नाही. तसेच मोकाट कुत्र्यांना पकडून शहराबाहेर सोडून दिले तर शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या कमी होईल, मात्र इतर भागात ही समस्या वाढून जाईल. यामुळे मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरण करून, कुत्र्यांची वाढत जाणारी संख्या नियंत्रणात येऊ शकते, असे मत काही प्राणीप्रेमींनी व्यक्त केले आहे. मात्र, या पर्यायालादेखील अनेक प्राणीप्रेमींचा विरोध आहे. मात्र, हा विरोध नागरिकांसाठी विशेष करून शहरातील लहान मुलांसाठी धोकेदायक ठरत आहेत.